मुंबई: बिग बॉस मराठीच्या 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुखने शनिवारी निक्की-अभिजीत सर्वांचीच शाळा घेतली. याचेच पडसाद आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळाले. निक्की-अरबाजमध्ये पुन्हा एकदा पॅचअप झालं आणि दुसरीकडे त्यांच्या गेमबद्दलही चर्चा रंगली. धक्का सुरू झाल्यानंतर जोडीमध्ये लावलेले बेल्ट रितेश सोडण्याचे आदेश देतो. याशिवाय घन:श्याम दरोडेशी रितेशने धरलेला अबोलाही त्याने सोडला. यानंतर आतापर्यंत एकत्र असलेल्या जोड्या डान्स परफॉर्मन्स सादर करतात.
यानंतर रितेश सर्व स्पर्धकांसोबत 'शॉकिंग' गेम खेळवतो. टास्क असा असतो की, प्रत्येक जोडीला खुर्चीवर बसवून त्यांना रितेश काही एकमेकांविषयी प्रश्न विचारतो. दोघांचे उत्तर सारखे येणे आवश्यक असते, तसे न आल्यास शॉक बँडचा शॉक बसणार असा हा खेळ असतो. पहिल्या फेरीत शॉक अंकिता आणि वर्षा यांना बसतात, कारण त्या एकाही प्रश्नाचे उत्तर बरोबर देत नाही. वैभव-डीपीलाही एकमेकांबद्दल काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाही आणि त्यांना शॉक बसतो. त्यानंतर आर्या-अरबाज, निक्की-अभिजीत, पॅडी-घन:श्याम, जान्हवी-सूरज या जोड्यानाही चांगलाच शॉक बसतो. वर्षा, घन:श्याम आणि निक्की या टास्कमध्ये तर अक्षरश: रडकुंडीला येतात.
यानंतर रितेश स्पर्धकांना त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मजेशीर रील्स दाखवतो. निक्कीच्या 'बाईssss हा काय प्रकार'पासून अंकिताच्या 'भांडी घासण्याच्या ट्रॉमा'पर्यंत विविध रील्स दाखवले जातात. यानंतर एक प्रँक सर्वांसोबत खेळला जातो. रितेश नॉमिनेट झालेल्या अंकिता, वर्षा, अभिजीत आणि वर्षा यांची धाकधूक वाढेल, असा प्रँक खेळतो.
रितेश सांगतो की सर्वाधिक मतं अभिजीतला, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मतं निक्कीला असून तिसऱ्या स्थानी वर्षा आहे. रितेश सांगतो की, अंकिता घरातून एलिमिनेट झाली आहे. अंकिताचं एव्हिक्शन सर्वांसाठी धक्कादायक असतं. ती घरातून पाटी घेऊन निघते, मुख्यद्वारही उघडलं जातं. डीपी, सूरज अक्षरश: ओक्साबोक्शी रडतात. जेव्हा दार उघडतं तेव्हा खरं सरप्राइज मिळतं, त्याठिकाणी असे लिहिलेले असते, 'इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वत: चांगलं खेळा, अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात.'
रितेशने केलेल्या या प्रँकनंतर सर्वजण आनंदी होतात. डीपी आणि सूरज पुन्हा एकदा अंकिताला मिठी मारुन रडतात.
2024-09-01T17:53:16Z dg43tfdfdgfd