वुमन्स प्रीमियर लीगला येत्या ९ जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ वर्ल्डकप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल. मुंबईच्या ताफ्यात यंदा इंजिनीयर असलेली विकेटकिपर फलंदाज खेळणार आहे. तिच्याबद्दल जाणून घेऊया.
विकेटकिपऱ फलंदाज असलेली राहिला फिरदोस हिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत काही महत्त्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. विराट कोहलीचे कव्हर ड्राईव्ह पाहून कमालीचे मैदानी फटके खेळत ती धावा करते. तर धोनीला आपला आदर्श मानत त्याच्या विकेटकिपिंगचे व्हीडिओ पाहत तिने स्वत:ला विकेटकिपर म्हणून घडवलं आहे. राहिल फिरदोस मूळची भोपाळची आहे आणि ती मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.
क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवण्यापूर्वी तिने तिच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं. तिने क्रिकेटची तिची आवड जोपासताना बी टेक पूर्ण करत इंजिनीयरिंगची पदवी देखील मिळवली आहे. क्रिकेटचा सराव आणि अभ्यासात योग्य तो ताळमेळ राखणं हे जणू जगण्याचं मार्ग झाल्याचं ती सांगते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशसाठी प्रभावी कामगिरी केल्यानंतर राहिला फिरदोस तिच्या कारकिर्दीत मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. राहिला फिरदोसला मुंबई इंडियन्सनने WPLच्या महालिलावात १० लाख रूपयांना आपल्या ताफ्यात सामील केलं. यासह ती आता या मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी तयार झाली आहे.
विकेटमागील तिची कुशल कामगिरी आणि खालच्या फळीत फलंदाजी करताना धावांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी ती ओळखली जाते. याशिवाय मध्यप्रदेश संघाचं नेतृत्त्वदेखील तिने केलं आहे. राहिला तिच्या या कामगिरीचं बरचसे श्रेय तिचा आदर्श असलेल्या धोनीला देते आणि आता मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली शिकण्यास उत्सुक असल्याचं तिने सांगितलं.
विराट कोहलीच्या मैदानावरील प्रभावाचं मला खूप कौतुक वाटतं, तर महेंद्रसिंग धोनीच्या शांत नेतृत्वशैली आणि निर्णयक्षमतेकडून मी नेहमीच प्रेरणा घेते. विशेषतः एमएस धोनीच्या विकेटकीपिंग कौशल्यांकडून मी खूप काही शिकते. टी-२० क्रिकेट अतिशय वेगवान असतं आणि त्यात झटपट निर्णय घेणं गरजेचं असतं. कर्णधारपदाचा अनुभव मला गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यास, क्षेत्ररक्षण सांभाळण्यास आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्यास मदत करतो,” असं राहिलाने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
“हरमन दीदी (हरमनप्रीत कौर)च्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वशैलीसह फलंदाजीही मला खूप आवडते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना नेतृत्वाचे अनेक पैलू शिकता येतील. WPL हे एक मोठं व्यासपीठ आहे. देशांतर्गत खेळाडूंना थेट संधी आणि ओळख मिळते. WPL मध्ये चांगली कामगिरी केल्यास खेळाडूची कारकीर्द पूर्णपणे बदलू शकते. या मंचावरून अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत,” असं राहिलाने सांगितलं.
हरमनप्रीत कौरबद्दल राहिला पुढे म्हणाली, “सर्वात आधी तर मी त्यांना मिठी मारेन. त्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वाकडे बारकाईने लक्ष देईन आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी हा अनुभव खूप शिकवणारा असणारा आहे.”
“मुंबई इंडियन्सबरोबर करार होईल, अशी मला अपेक्षा होती, कारण ट्रायल्समध्ये माझी कामगिरी खूपच चांगली झाली होती. वरिष्ठ खेळाडूंंकडून मला भरपूर कौतुक आणि महत्त्वाच्या सूचना मिळाल्या. विशेषतः फलंदाजीमध्ये मी मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्समध्ये चांगली कामगिरी केली. या संघासोबत एक उत्तम हंगाम घालवण्याकरता मी उत्सुक आहे,” असं तिने सांगितलं.
2026-01-08T11:35:16Z