Ruturaj Gaikwad List A cricket Record: भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर दबदबा कायम ठेवला आहे. वादळी खेळी, शतकांच्या जोरावर त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने एक असा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो जगात आजवर कोणालाच जमला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईकल बेवन, दिग्गज विराट कोहली सारख्या मोठ्या फलंदाजांना मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड नावे केला.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचं नेतृत्त्व मराठमोळा ऋतुराज गायकवाड करत आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना संघाचा तारणहार ठरला आहे. त्याने गोवाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात एकट्याने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. ऋतुराजने यासह लिस्ट ए क्रिकेटमधील ९५ डावांमध्ये २० शतकांचा टप्पा गाठला आणि ५ हजार धावा देखील पूर्ण केल्या. याच्या जोडीला त्याने थेट विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना लिस्ट ए क्रिकेटमधील लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी गाठली आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता ऋतुराज गायकवाडच्या नावे आहे. ८ जानेवारीला गुरूवारी गोवाविरूद्ध सामन्यात त्याने ५८.८३ च्या सरासरीने धावा केल्या. त्याने फक्त ९५ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. यापूर्वी, लिस्ट ए क्रिकेटमध्ये हा विक्रम मायकेल बेवन यांच्या नावावर होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ४२७ लिस्ट ए सामने खेळले, यादरम्यान त्यांची सरासरी ५७.८६ होती.
मायकेल बेवन ५७.८६च्या सरासरीसह पहिल्या स्थानी होते. मायकेल बेवन अजूनही एक महान तत्कालीन खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९४ मध्ये पदार्पण केलं आणि २००४ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इंग्लंडचा सॅम हेन त्यांच्या पाठोपाठ आहेत. त्याने ६४ लिस्ट ए सामने खेळले आहेत आणि ५७.७६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पण, २०२३ पासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामने समाविष्ट असतात, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांसह देशांतर्गत स्पर्धांमधील सामन्यांचाही समावेश होतो. ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सामना खेळत आहे. यादरम्यान त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १३१ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १३४ धावांची नाबाद खेळी केली. यासह त्याच्या संघाने २०० अधिक धावांचा टप्पा गाठला.
2026-01-08T08:50:15Z