‘कमजोर खेळाडू’ म्हणून हिणवणाऱ्या कार्लसनला भारताच्या गुकेशनं हरवलं, पराभवानंतर मॅग्नसला करावं लागलं कौतुक!

“कदाचित मी क्लासिक प्रकारासाठी योग्य नाही”, अशी जाहीर कबुली देऊन अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारताचा ग्रँड मास्टर आणि बुद्धिबळाचा वर्ल्ड चॅम्पियन गुकेशसमोरचा पराभव मान्य करणाऱ्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला पुन्हा एकदा गुकेशनं चारीमुंड्या चित केलं आहे. झॅग्रेबमध्ये पार पडलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया २०२५ स्पर्धेतील सामन्या गुकेशनं मॅग्नस कार्लसनला रॅपिड अँड ब्लिट्झ या अवघड प्रकारात नमवलं आणि आपणच ६४ घरांचे अनभिषिक्त सम्राट होण्यासाठी पहिले दावेदार असल्याचं सिद्ध केलं.

मॅग्नसचं गर्वहरण, गुकेशचा सलग दुसरा विजय

जागतिक बुद्धिबळपटूंमध्ये मॅग्नस कार्लसनचं नाव सध्या सर्वोच्च शिखरावर आहे. पण याच कार्लसनला भारताच्या गुकेशनं सलग दुसऱ्यांदा दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पराभूत करण्याची किमया साध्य केली आहे. विशेष म्हणजे गुकेशची खेळण्याची पद्धत ही क्लासिक असूनही रॅपिड अँड ब्लिट्झ या अवघड प्रकारात गुकेशनं मॅग्नस कार्लसनला मोठ्या हिकमतीनं खेळत हरवून दाखवलं. स्पर्धा सुरू होण्याआधी गुकेशला ‘कमजोर खेळाडू’ म्हणून हिणवणाऱ्या कार्लसनला गुकेशनं आपल्या खेळातून सडेतोड उत्तर दिलं.

गुकेशबाबत काय म्हणाला होता मॅग्नस कार्लसन?

मॅग्नस कार्लसननं स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना गुकेश या स्पर्धेतला आणि या प्रकारातला एक कमजोर खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. “गुकेश रॅपिड अँड ब्रिट्झ प्रकारात कितपत पुढे जाऊ शकेल याबाबत शंका आहे. गुकेशविरोधात या स्पर्धेदरम्यान होणाऱ्या सामन्यांमध्ये (रॅपिड प्रकारातील एक व ब्लिट्झ प्रकारातील दोन) तो स्पर्धेतील काही कमजोर खेळाडूंपैकी एक असल्याप्रमाणे खेळेन”, असं कार्लसन म्हणाला होता. “या स्पर्धेदरम्यान या प्रकारात गुकेशची कामगिरी चांगली होईल असं त्यानं काहीही करून दाखवलेलं नाही. त्यामुळे या प्रकारात तो चांगला खेळाडू आहे किंवा नाही हे अजून सिद्ध व्हायचंय. त्याला खूप काही करून दाखवायचंय”, असंही कार्लसन म्हणाला होता.

2025-07-04T06:05:26Z