किंग कोहलीकडून ‘क्वीन्स ऑफ इंडिया’ भारतीय महिला संघाला खास शुभेच्छा, म्हणाला…

Virat Kohli Message: महिला क्रिकेट संघाची विश्वविजेतेपदासाठीची प्रतिक्षा अखेर रविवारी संपली. नवी मुबंईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच आयसीसीची विश्वचषक ट्रॉफी जिंकली. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचा विजय साकार झाला. या विजयानंतर संबंध भारतातून कौतुक होत असताना स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही महिला संघाचे कौतुक केले.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने आजवर तीन वेळा आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र यापूर्वी दोन वेळा जेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. मात्र २ नोव्हेंबरचा दिवस महिला संघासाठी खास ठरला. वर्षानुवर्षे अनेक महिला क्रिकेटपटूंनी केलेल्या मेहनतीला आज खरे यश मिळाले.

भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते इतर राजकारणी, क्रीडापटू, सेलिब्रिटी हरमनप्रीत कौरच्या संघाचे कौतुक करत आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संघाला शुभेच्छा दिल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले, “मुलींनी इतिहास रचला आणि इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमाला अखेर प्रत्यक्षात उतरताना पाहून एक भारतीय म्हणून मला आत्यंतिक अभिमान वाटत आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी हरमन आणि संपूर्ण टीमचे कौतुक आणि खूप खूप अभिनंदन करायला हवे. पडद्यामागून काम करणाऱ्या संपूर्ण टीम आणि व्यवस्थापनाचेही अभिनंदन. या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या. या विजयामुळे मुलींच्या पुढील पिढ्यांना हा खेळ खेळण्याची प्रेरणा मिळेल. जय हिंद.”

2025-11-02T21:05:10Z