‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी; विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा…

मुंबई : राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियम स्विमिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५’ या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या पुरुषांच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत मुंबई विद्यापीठाच्या दीपक पाटील या विद्यार्थ्याने अचूक तंत्र, दमदार वेग आणि उत्कृष्ट तयारीच्या जोरावर रौप्य पदक पटकावले. दीपक पाटील यांनी २:२८:८६ अशी उत्तम वेळ नोंदवत चमकदार कामगिरी केली आहे. प्रथम क्रमांक प्राप्त जैन विद्यापीठाच्या मणिकांत एल. यांनी २:२४:८७ वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर पंजाब विद्यापीठाच्या केशव कौशिक यांनी २.२९.५५ वेळ नोंदवत कांस्य पदक मिळवले. दीपक पाटील यांची ही गुणवत्ता पूर्ण खेळी त्यांच्या कठोर परिश्रम आणि सातत्याचे द्योतक असून मुंबई विद्यापीठाच्या पदकतालिकेत महत्त्वपूर्ण भर घालणारी ठरली.

मुंबई विद्यापीठाच्या जलतरणपटूंनी ४ ×२०० मीटर फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत आणखी एक उल्लेखनीय यश संपादन करत कांस्य पदक जिंकले. रूपक जोशी, अश्विन जयस्वाल, अथर्व म्हात्रे आणि शुभम होले या चौकडीने प्रभावी समन्वय, उत्कृष्ट स्ट्रोक तंत्र आणि शेवटपर्यंत लढण्याच्या जिद्दीच्या जोरावर हे पदक पटकावले. या विजयामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदकतालिकेत आणखी भर पडली असून संघाच्या एकात्मिक खेळीची उत्कृष्ट झलक पाहायला मिळाली.

मुंबई विद्यापीठाच्या संघाला व्यवस्थापक-प्रशिक्षक डॉ. मनोज आर. वर्मा, तसेच युनिव्हर्सिटी कॉन्टिन्जन्सी मॅनेजर डॉ. सागर अर्जुन तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारडे, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. मनोज रेड्डी यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

2025-11-30T10:20:15Z