राजापूर: देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. १९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांच्या खेळीमुळे भारताने इंग्लंडवर कसोटीतील पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर झळकावलेल्या माझ्या तीन शतकांपैकी १९८६ मधील शतकी खेळी विशेष अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
राजापूर येथील जन्मस्थळाला भेट देण्यासाठी आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना वेंगसरकर बोलत होते. क्रिकेट आज तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळले जाणे ही अत्यंत सकारात्मक बाब असून, प्रत्येक खेळाडूने या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
वेंगसरकर यांचा जन्म राजापूर येथे त्यांच्या आजोळी झाला. राजापूर शहरातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात कुलकर्णी हे त्यांचे मामा होत. या भेटीत त्यांनी बालपण, शिक्षण आणि त्या काळातील वातावरणाबाबत आठवणी सांगत आजोळच्या शेजाऱ्यांचाही आवर्जून उल्लेख केला. “राजापूरच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
पूर्वीचे आणि आजचे क्रिकेट यामध्ये मोठा फरक झाल्याचे सांगताना ते म्हणाले, पूर्वी क्रिकेटमध्ये पैसा नव्हता. त्यामुळे नोकरी सांभाळत क्रिकेट खेळावे लागत होते. मात्र, अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आल्याने खेळाडूंना करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे ही त्यांनी सांगितले.
टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, खेळाडूंनी तिन्ही प्रकारांमध्ये स्वतःला जुळवून घेणे अत्यावश्यक आहे. भारतीय क्रिकेटसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेट खेळणे सुरू ठेवावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
महिला क्रिकेटबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले की, भारतातील महिला क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल होत आहेत. महिला खेळाडूंनी मिळवलेले विश्वविजेतेपद नक्कीच कौतुकास्पद असून, ते महिला क्रिकेटसाठी दिशादर्शक ठरेल. यावेळी महाराष्ट्र क्रिकेटचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ, माजी रणजी खेळाडू मिलिंद कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, मंदार दीक्षित आदी उपस्थित होते.
2026-01-09T07:50:12Z