पिंक बॉलचा सामना करण्यासाठी स्टीव्हन स्मिथचा ‘आय ब्लॅक’चा उतारा; काय आहे नेमका प्रकार?

अ‍ॅशेस मालिकेतला दुसरा कसोटी सामना डे नाईट असणार आहे. या सामन्यात पिंक बॉलचा नीट सामना करता यावा यााठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने अनोखी शक्कल शोधून काढली आहे.

डे नाईट टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सराव सुरू होता. सरावादरम्यान स्मिथने डोळ्यांच्या खाली स्टिकरसारखं काहीतरी लावल्याचं दिसलं. काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजचा भरवशाचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने डोळ्यांखाली अशीच पट्टी लावली होते. स्मिथनेही तसंच काहीसं केलंय यावरून चर्चा सुरू झाली. हे टॅटू नसून पिंक बॉलचा सामना करता यावा यासाठी स्मिथने योजलेली युक्ती आहे.

स्मिथने दोन्ही डोळ्यांखाली आय ब्लॅक लावलं आहे. आय ब्लॅक म्हणजे ग्रीससारखा प्रकार असतो. ग्रीससदृश रसायन पट्टीमुळे सूर्यप्रकाशाचा झोत डोळ्यांवर पडतो त्याचा प्रभाव कमी होतो. डे नाईट टेस्ट सुरू होते तेव्हा पहिले काही तास नैसर्गिक सूर्यप्रकाश असतो. त्यावेळी सूर्यकिरणं थेट डोळ्यात जातात. अशावेळी पिंक बॉल टिपणं कठीण होतं.तसं होऊ नये यासाठी स्मिथने ही क्लृप्ती लढवली आहे.

सूर्यप्रकाशाच्या लालसर पिवळ्या प्रकाशात पिंक बॉल नीट दिसावा यासाठी स्मिथने हा उतारा शोधून काढला आहे.

डे नाईट टेस्टची सुरुवात होते तेव्हा दुपार असते. तेव्हा नैसर्गिक प्रकाश असतो. थोड्या वेळानंतर उन्हं कलतात . नंतर ऊनसावलीचा खेळ सुरू होतो. मग कातरवेळी नैसर्गिक प्रकाश कमी होत जातो आणि कृत्रिम प्रकाश देणारे लाईट टॉवर सुरू होतात. या काळात स्विंग होणारा पिंक बॉल टिपणं फलंदाजांना कठीण जातं. आधुनिक क्रिकेटमधल्या अव्वल शिलेदारांपैकी एक असलेल्या स्मिथने हा धोका ओळखून युक्ती केली आहे.

नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखातीतून सावरला नसल्याने डे नाईट टेस्टमध्येही स्मिथकडेच नेतृत्वाची धुरा असणार आहे. पर्थ कसोटीत स्मिथला मोठी खेळी करता आली नव्हती. ३६वर्षीय स्मिथ कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. मायदेशात गेल्या तीन हंगामात त्याची सरासरी ३४.३३, ५३.२७ आणि ३३.१८ अशी आहे. कारकिर्दीतील सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या तुलनेत ही सरासरी स्मिथच्या लौकिकाला साजेशी नाही.

क्रिकेटमध्ये हा ट्रेंड नवीन असला तरी अमेरिकेत होणाऱ्या द नॅशनल फुटबॉल लीग स्पर्धेत खेळाडू आय ब्लॅकचा सर्रास वापर करतात.

2025-12-01T08:35:14Z