प. बंगालमध्ये जन्म, पाळंमूळं केरळात, निवड ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप संघात; जॉन जेम्सचा प्रेरणादायी प्रवास

Australia U-19 all-rounder John James: १५ जानेवारीला झिम्बाब्वे व नामिबियामध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप सुरू होतोय आणि भारतीयांसाठी त्यातही केरळसाठी अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे जन्मानं प. बंगालमधल्या खरगपूरचा असलेल्या व मूळच्या केरळच्या जॉन जेम्सचा ऑस्ट्रेलिया संघामध्ये ऑल राउंडर म्हणून समावेश करण्यात आलाय. आजी आजोबांमुळे अजूनही केरळशी घटट नाळ असलेल्या जेम्ससाठी व भारतीयांसाठी व केरळसाठी ही अभिमानाची बाब मानली जातेय.

खरगपूरमध्ये जन्म झाला असला तरी जन्मानंतर लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये जेम्सचं कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत झालं. सिडनीमध्ये आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे क्रिकेटचे धडे गिरवलेल्या जेम्सला ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाल्याचा जेव्हा कॉल आला, तेव्हा साहजिकच त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अत्यंत व्यस्त असूनही आई वडिल नी कधी कधी भाऊ जेम्सला ट्रेनिंग कँपसाठी साथ द्यायचे याची तो आवर्जून आठवण काढतो.

१९ वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या व ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज झालेल्या जेम्सच्या मनात मात्र केरळ आहे. प्रत्येक सुट्टीमध्ये केरळला भेट देणाऱ्या जेम्सच्या तोंडावर भारतीय खाद्यपदार्थांची चव रेंगाळतेय. आजीच्या हातची पोर्क चटणी आपल्याला प्रचंड आवडते असं तो सांगतो. सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर २२५ धावा लागल्या. यामध्ये आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जेम्सच्या ६८ चेंडूंमध्ये ७७ नाबाद धावांचा समावेश होता. तो सामना भारतानं जिंकला परंतु अत्यंत दबावाची स्थिती असताना केलेल्या त्याच्या खेळीची दखल सगळ्यांना घ्यायला लागली. मधल्या फळीत फलंंदाजी करायला जेम्सला आवडतं परंतु मध्यमगती गोलंदाजी मात्र नवीन बॉल असो किंवा डेथ ओव्हर असो कधीही करण्यास त्याची तयारी असते.

अवघ्या नवव्या वर्षी क्रिकेट विश्वात चिमुकलं पाऊल टाकलेल्या जेम्सला मदतकेली रायडन गोम्स या मित्रानं. त्याच्याबरोबर खेळतानाच जोमेश जॉन व स्मिथा थॉमस या माता-पित्यांना जेम्समध्ये असलेल्या क्रिकेटरची ओळख पटली व त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. विशेष म्हणजे जोमेश स्वत: फूटबॉल व बास्केटबॉलचे खेळाडू असूनही त्यांनी जेम्सला क्रिकेट खेळण्याचं केवळ स्वातंत्र्यच दिलं नाही तर त्याला भक्कम पाठिंबा दिला. अर्थात वडिलांमुळे असेल किंवा आजुबाजुच्या माहोलमुळे १६ वर्षांचा होईपर्यंत जेम्सचं पहिलं प्रेम फूटबॉल होतं. यानंतर मात्र त्यानं क्रिकेटलाच गंभीरपणे घेतलं. ट्रेनिंग सेशन्सला घेऊन जाणं असो, नेट्समध्ये बॉलिंग टाकून सराव देणं असो किंवा बहुमुल्य सल्ला असो, सगळ्या जबाबदाऱ्या जोमेश यांनी पार पाडल्या आणि आज त्याची गोमटी फळं ऑस्ट्रेलियन जर्सीच्या रुपानं बघायला मिळत आहेत. फूटबॉल खेळण्याचा जेम्सला झालेला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो एक अत्यंत चांगला अॅथलीट आहे ज्याचा साहजिकच क्रिकेटमध्ये खूप फायदा होतो. फिल्डिंग असो की लाँग स्पेल्स असलेली फास्ट बॉलिंग असो जेम्स ते अथक करू शकतो.

हॉर्न्सबी क्रिकेट क्लबकडून जिल्हा पातळीवर खेळायला सुरूवात केल्यानंतर ग्रीन शील्ड क्रिकेट टूर्नामेंटमध्ये त्यानं ठसा उमटवला. खेळातलं सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे हे सांगताना जेम्सच्या डोळ्यासमोर इंग्लंडच्या बेन स्टोक्सचा आदर्श आहे. एखादी खेळी खराब झाली तर पुढची खेळी चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्यावर व सकारात्मक राहण्यावर त्याचा भर आहे. जेम्सला जोश मिलर यांंचं मार्गदर्शन मिळतंय. जेम्स म्हणतो मिलर यांच्यासोबत काम करताना जाणवलेली गोष्ट म्हणजे फक्त तंत्र म्हणजे सगळं काही नसतं तर आपली मन:स्थिती कशी आहे हे ही महत्त्वाचं असतं. जर विचार स्पष्ट असतील, खेळातले बारकावे, परिस्थिती नीट बघता येत असेल तर मग क्रिकेट हा आधी निर्णय घेण्याचा नी नंतर ते अमलात आणण्याचा खेळ होतो. क्रिकेट फक्त खेळायचं नसतं, तर क्रिकेटकडे नीट बघायचं असतं, अॅनालिसिस करायचं असतं, काय घडू शकतं याचा अंदाज घ्यायचा असतो. थोडक्यात क्रिकेट फक्त बॅट नी बॉलनं नाही तर डोक्यानं खेळायचा गेम आहे. हे तो शिकला आधीचे कोच अँथनी क्लार्क यांच्याकडून. खेळाकडे बघण्याची दृष्टी क्लार्क देतात असं सांगत तो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

त्याची बॅटिंगबद्दल क्लॅरिटी पक्की आहे. कुठलाही फॉरमॅट असू दे आधी सिंगल्स काढा, बेस तयार करा, सेट्ल व्हा मग त्यावर इमारत उभी करा. डिफेन्स चांगला हवा एकदा तो पक्का झाला की नंतर अटॅक करता येतो इतकं साधं तत्त्व तो पाळतो.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या वेळी ड्रिंक्स बॉय म्हणून सिडनी टेस्टला निवडलं होतं. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे ३ दिवस होते असं तो सांगतो. मिचेल स्टार्कनं १४५ स्पीडचा तुफानी स्पेल टाकलेला. पाणी द्यायला गेलेला जेम्स त्याला एकदाचा तुफानी स्पेल पडला असं गमतीत म्हणाला. हसत स्टार्कनं उत्तर दिलं, त्यासाठी आता मी खूप म्हातारा होत चाललोय मित्रा. कुठला खेळाडू विचार करायला भाग पाडतो या प्रश्नावर जेम्स म्हणतो, पॅट कमिन्स. केवळ कौशल्य नाही तर त्याचं अस्तित्वच हवंहवंसं वाटणारं आहे. बॅट असो की बॉल कमिन्सची उपस्थिती जाणवतेच. तसंच काहीसं आपलंही व्हावं अशी त्याची इच्छा आहे. प बंगालमध्ये जन्माला आलेल्या, मूळच्या केरळच्या व आता ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणाऱ्या भारतीय जॉन जेम्सची वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी होते लवकरच कळेल.

2026-01-08T09:20:13Z