बलाढ्य मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबची दैना कशामुळे?

फर्ग्युसन पर्वात आलेख कसा उंचावला?

स्कॉटलंडचे माजी खेळाडू सर अॅलेक्स फर्ग्युसन यांची १९८६ मध्ये मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि काही वर्षांतच युनायटेडने इंग्लिश फुटबॉलवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे तोपर्यंत प्रशिक्षक म्हणून फर्ग्युसन यांची कामगिरी फारशी लक्षवेधी नव्हती. पण मँचेस्टरला आल्यानंतर फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडने तब्बल ३८ चषकांवर आपले नाव कोरले. यात १९९२-९३ ते २०१२-१३ या दोन दशकांमध्ये १३ वेळा इंग्लिश प्रीमियर लीग जेतेपदांचा समावेश होता. फर्ग्युसन यांनीच युनायटेडला क्लब फुटबॉलमधील सर्वांत प्रतिष्ठेची ‘युएफा चॅम्पियन्स लीग’ दोन वेळा जिंकवून दिली. इतक्या प्रथितयश प्रशिक्षकाचा पर्याय शोधणे अवघड जाणार होते आणि हेच घडले.

त्या तोडीचा प्रशिक्षक सापडेना?

फर्ग्युसन यांच्या निवृत्तीनंतर युनायटेडच्या प्रशिक्षकपदी सर्व प्रथम डेव्हिड मोयेस यांची नेमणूक करण्यात आली. मोयेस यांनी एव्हर्टन क्लबकडून दर्जेदार कामगिरी करवून घेतली होती. परंतु युनायटेडसारखा बलाढ्य क्लब आणि त्यातील दिग्गज खेळाडूंचे अहंकार हाताळणे मोयेस यांना जमले नाही. त्यामुळे वर्षभराआधीच त्यांना पदावरून हटविण्यात आले. यानंतर बार्सिलोना, बायर्न म्युनिक आणि नेदरलँड्स यांसारख्या मातब्बर संघांना मार्गदर्शन केलेले लुइस वॅन गाल; पोर्टो, चेल्सी आणि इंटर मिलानसारख्या संघांना ऐतिहासिक यश मिळवून दिलेले जोसे मोरिन्यो; युनायटेडचे माजी आक्रमकपटू ओले गनर सोलस्कायर; नेदरलँड्समधील आयॅक्स संघासाठी चमकदार कामगिरी केलेले एरिक टेन हाग आणि अखेरीस पोर्तुगालच्या स्पोर्टिंग लिस्बन क्लबला समर्थपणे मार्गदर्शन केलेले रूबेन अॅमोरिम यांसारख्या नामांकितांना युनायटेडचे प्रशिक्षकपद भूषविण्याची संधी मिळाली. मात्र, यापैकी एकालाही प्रीमियर लीग किंवा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवता आले नाही. मोरिन्यो आणि वॅन गाल यांच्या बाबतीत हे अपयश विशेष खुपणारे ठरले. एकीकडे फर्ग्युसन यांनी १५०० सामन्यांत युनायटेडचे प्रशिक्षकपद भूषवले होते, तर दुसरीकडे त्यांच्यानंतरचा एकही प्रशिक्षक १५० हून अधिक सामने पदावर टिकू शकला नाही.

गत हंगामात सुमार कामगिरी?

मँचेस्टर युनायटेडसाठी २०२४-२५ हंगाम अत्यंत खराब ठरला. एकाच हंगामात टेन हाग, रूड वॅन निस्टलरॉय (हंगामी) आणि अॅमोरिम असे तीन प्रशिक्षक बदलले. युनायटेडने ‘युएफा युरोपा लीग’ची अंतिम फेरी गाठली, पण त्यात त्यांना टॉटनहॅमकडून पराभव पत्करावा लागला. एकूण २० संघांचा समावेश असलेल्या प्रीमियर लीगमध्ये युनायटेडचा संघ १५व्या स्थानी राहिला. १९८९-९० नंतर युनायटेडचा संघ इतक्या खालच्या क्रमांकावर कधीही राहिला नव्हता. त्यांना ३८ सामन्यांत केवळ ४२ गुण मिळवता आले. गुणांच्या बाबतीत ही युनायटेडची १९७३-७४ सालापासून सर्वांत वाईट कामगिरी ठरली. ‘एफए चषका’चे जेतेपद राखण्यातही त्यांना अपयश आले. त्यामुळे मँचेस्टर युनायटेड संघ पुढील हंगामासाठी कोणत्याही युरोपीय स्पर्धेकरिता पात्र ठरला नाही. यापूर्वी असे केवळ दोनदा (१९८९-९०, २०१३-१४) घडले होते. त्यामुळे चाहत्यांचा रोष वाढतच गेला. नव्या हंगामात अॅमोरिम यांनी क्लबच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आणि नव्या प्रशिक्षकाचा पुन्हा शोध सुरू झाला.

गैरव्यवस्थापन कारणीभूत?

मैदानावर अपयश येत असतानाच मँचेस्टर युनायटेडची मैदानाबाहेरही स्थिती फारशी चांगली नाही. युनायटेडवर एक अब्ज पौंडपेक्षा अधिकचे कर्ज आहे. याच गैरव्यवस्थापनामुळे युनायटेडचे मालक ग्लेझर कुटुंबावर चाहत्यांची नाराजी आहे. २०२२ मध्ये ग्लेझर कुटुंबाने नव्या गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला. ब्रिटनचे अब्जाधीश जिम रॅटक्लिफ यांच्या इनियॉस स्पोर्टने २०२३ साली क्लबमध्ये २५ टक्के हिस्सा मिळवला. मात्र, स्थिती फारशी सुधारली नाही. युनायटेडच्या ‘थिएटर ऑफ ड्रीम्स’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमचे छत गळणे, सामन्यांच्या तिकिटांचे दर वाढवावे लागणे, क्लबच्या आर्थिक अडचणींमुळे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे, परदेशातील सामन्यांसाठी सहाय्यकांच्या चमूचा सर्व खर्च प्रशिक्षकाला उचलावा लागणे असे प्रकार घडले. तसेच प्रत्येक वेळी प्रशिक्षक बदलानंतर त्यांच्या मागणीनुसार नवे खेळाडू घेण्यासाठी मोठा पैसा खर्च झाला. युनायटेडच्या इतिहासातील सर्वांत महागडे १० खेळाडू गेल्या दशकभरातच खरेदी केले गेले. मात्र, केवळ चौघे सध्याच्या संघाचा भाग आहेत. या सर्व परिस्थितीमुळेच युनायटेडची पीछेहाट सुरू आहे.

2026-01-09T22:35:12Z