बांगलादेशची विनंती अमान्य! ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामने भारताबाहेर हलविण्यास ‘आयसीसी’चा नकार; चर्चा सुरू

चेन्नई : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारतात नियोजित सामने श्रीलंकेत हलविण्याची बांगलादेश क्रिकेट मंडळाची (बीसीबी) विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेटाळून लावली आहे. भारतात कोणत्याही संघाला सुरक्षेचा धोका असल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही आणि सदस्य खेळ करारानुसार (एमपीए) ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे बांगलादेश संघाला भारतातच सामने खेळावे लागतील, असे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या आभासी बैठकीत ‘आयसीसी’ने स्पष्ट केल्याची माहिती मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूचनेनंतर ‘आयपीएल’ संघ कोलकाता नाइट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला संघमुक्त केले. या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील हंगामी सरकार आणि ‘बीसीबी’ने आक्रमक भूमिका घेताना, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठविण्यास नकार दिला. सामने सह-यजमान असलेल्या श्रीलंकेत खेळविण्याची ‘बीसीबी’ने ‘आयसीसी’कडे विनंती केली. मात्र, ती अमान्य करण्यात आली आहे. आता पुढील निर्णयासाठी ‘बीसीबी’ने वेळ मागितला आहे. सध्या ‘आयसीसी’ कोणताही पर्यायी कार्यक्रम तयार करत नसून अंतिम निर्णय शनिवारपर्यंत घेतला जाणे अपेक्षित आहे.

‘आयसीसी’कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नसली, तरी ‘आयसीसी’ने आपल्या विनंतीला प्रतिसाद दिल्याचे ‘बीसीबी’कडून सांगण्यात आले आहे. “भारतामध्ये बांगलादेश संघाच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेसंदर्भात ‘आयसीसी’कडून आम्हाला उत्तर मिळाले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेश संघाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘आयसीसी’ कटिबद्ध आहे. सुरक्षाव्यवस्थेबाबत ‘बीसीबी’ने उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेतले जातील आणि त्यावर सखोल चर्चाही होईल असे ‘आयसीसी’ने आम्हाला आश्वासन दिले आहे,” असे ‘बीसीबी’ने बुधवारी निवेदनात म्हटले.

कोणताही धोका नाही

“कुठल्याही संघाला भारतामध्ये कोणताही धोका नसल्याचे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता महिनाभराचा कालावधीच शिल्लक आहे. इतक्या कमी वेळेत वेळापत्रक बदलणे शक्य होणार नाही. ‘बीसीबी’ला सदस्य खेळ करार अर्थात ‘एमपीए’ची आठवण करून देण्यात आली आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

नमते घ्यावे लागणार?

बांगलादेशला त्यांचे सामने भारतातच खेळावे लागणार यावर ‘आयसीसी’ ठाम राहिल्याने ‘बीसीबी’लाच आता नमते घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. सध्या बांगलादेशसमोर त्यांच्या सरकारकडून भारतात जाण्यास परवानगी मिळवणे हा एकमेव पर्याय आहे. “आम्ही आयसीसी आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू ठेवू. संघाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे ‘बीसीबी’ने स्पष्ट केले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून साखळी फेरीत बांगलादेश संघाचे तीन सामने कोलकाता, तर एक सामना मुंबईत नियोजित आहे.

कोणतीही ताकीद नाही!

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामने ठरल्याप्रमाणे भारतात खेळा किंवा गुण गमवा, अशी ‘आयसीसी’ने ‘बीसीबी’ला ताकीद दिल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे ‘बीसीबी’नेच स्पष्ट केले आहे. ‘‘हे दावे पूर्णपणे खोटे आणि निराधार असून ते ‘आयसीसी’शी झालेल्या चर्चेचे स्वरूप किंवा आशय दर्शवत नाहीत,’’ असे ‘बीसीबी’ने म्हटले आहे.

…तर अन्य संघाला संधी?

– भारतात खेळा किंवा गुण गमवा, अशी ‘आयसीसी’ने ‘बीसीबी’ला ताकीद दिल्याची शक्यता कमीच आहे. बांगलादेशचे चारही साखळी सामने भारतात नियोजित आहेत. त्यामुळे बांगलादेश संघाने खेळण्यास नकार दिल्यास एक संघच आपोआप कमी होईल.

– या परिस्थितीत अन्य एखाद्या संघाला स्पर्धेत खेळण्यासाठी आमंत्रित केले जाईल. मात्र, ‘बीसीबी’ला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. त्यामुळे बांगलादेश संघ भारतात खेळण्याचीच शक्यता अधिक आहे. 

2026-01-07T21:20:16Z