BCCI: भारतीय संघाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या क्रिकेट सल्लागार समितीने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून अजय रात्रा यांच्या नावाची घोषणा केली आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आहेत. तर निवडकर्ते सलील अंकोला यांच्या जागी अजय रात्रा निवड समितीत सामील झाले आहेत.
हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
अनुभवी भारतीय खेळाडू
भारताचा माजी यष्टिरक्षक फलंदाज अजय रात्रा यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यांचा रेकॉर्डही कमाल आहे. आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय, २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेदरम्यान ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग होते. अजय रात्रा हे एक अनुभवी खेळाडू राहिले आहेत.
निवडकर्ता म्हणून, अजय रात्रा यांचे पहिले प्राधान्य सर्वोत्तम खेळाडूंमधील प्रतिभा ओळखणे असेल. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते निवड समितीच्या विद्यमान सदस्यांसोबत काम करतील. रात्रा हे निवड समितीत कधी सामील होतील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ते टीम इंडियाच्या निवड समितीचा भाग असणार की नाही, याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड
अजय रात्रा यांनी २००२ मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. यानंतर त्यांनी ६ कसोटीत १६३ धावा आणि १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ९० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ९९ सामन्यांमध्ये ४०२९ धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी ८९ लिस्ट-ए सामन्यांमध्ये १३८१ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते हरियाणा संघाकडून खेळत.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, सकाळी ९.३०, चेन्नई
दुसरा कसोटी सामना – २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर, सकाळी ९.३०, कानपूर
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना – ६ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.०० वाजता, धर्मशाला
दुसरा टी-२० सामना – ९ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.०० वाजता, दिल्ली
तिसरा टी-२० सामना – १२ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.०० वाजता, हैदराबाद
2024-09-03T15:58:17Z dg43tfdfdgfd