वर्ल्डकप विजेते प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाचं जेतेपद आपल्या नावे केलं. भारतीय खेळाडूंप्रमाणेच कोच अमोल मुझुमदार यांचं या विजयात मोलाचं योगदान आहे. संघाला योग्य ते मार्गदर्शन करत वेळप्रसंगी खडसावून सांगत खेळाडूंमधील ती वर्ल्डकप विजयाची आग कायम ठेवली. भारतीय महिला संघाला अनेकदा विश्वचषकाने एक पाऊल जवळ येत हुलकावणी दिली होती. सेमीफायनल जिंकल्यानंतर खेळाडूंना फायनलसाठी तयार करणं, त्याची जाणीव करून देणं हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं.
लोकसत्ता गप्पा या विशेष कार्यक्रमात प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी उपस्थिती दर्शवली होती. नॉरर्न रिअल्टी मुख्य प्रायोजक आणि केसरी टूर्स सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर एम के घारे ज्वेलर्स आणि हावरे प्रॉपर्टीज आहेत. यादरम्यान फायनलला जाण्यापूर्वी संघाशी काय बोलणं झालं, असा त्यांना प्रश्न विचारला.
प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले, “एक चॅलेंज काय होत माहितीये. सेमीफायनलला आपण ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकलो आणि तेव्हा खूप इमोशन्स बाहेर पडले. माझ्याकडून हरमन, स्मृती जेमिमा सर्वांकडून ते इमोशन्स बाहेर पडले. ते इमोशन्स बाहेर पडणं कधीकधी चांगली गोष्ट असते, कधीकधी चांगली गोष्टही नसते. कारण ते सगळं विल पॉवर होती, ते इमोशन्समधून बाहेर पडलं. त्यांना पुन्हा ३ दिवसांत फायनल आहे, ३० ऑक्टोबरला झालेली गोष्ट विसरणं आणि २ नोव्हेंबरमध्ये येणं फार गरजेचं होतं. मला सारखं वाटत होतं, त्यांना २ नोव्हेंबरमध्ये आणलं पाहिजे.”
“तेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये एक छोटी लाईन बोललो. आपण जी मेहनत केली, जी २ वर्षे मेहनत केली ती ३० ऑक्टोबरसाठी नाही तर २ नोव्हेंबरसाठी केली. ते एक चॅलेंज होतं आणि बस्स मग रेस्ट इज हिस्ट्री..”, असं पुढे कोच अमोल मुझुमदार यांनी म्हटलं. अमोल मुझुमदारांना दरम्यान विचारलं की तुम्हाला खेळाडू की कोच कोणता रोल जास्त आवडतो. तेव्हा ते म्हणाले, सध्या म्हणाल तर कोच हा रोल आवडतो.
2025-11-29T16:05:13Z