“मी ३७ वर्षांचा आहे त्यामुळे…”, विराट कोहलीचं शतकी खेळीनंतर मोठं वक्तव्य, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला?

Virat Kohli on Comeback in Test Cricket: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात १३५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. विराट कोहलीच्या शतकासह भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. टीम इंडियाने पहिल्या वनडे सामन्यात ३४९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात द. आफ्रिकेचा संघ ३३२ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने १७ धावांनी रोमांचक विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शतकवीर किंग कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला.

विराट कोहलीने या सामन्यात १२० चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह १३५ धावांची वादळी खेळी केली. याशिवाय विराट कोहलीने रोहित शर्मासह १०३ चेंडूत १३६ धावांची भागीदारीही रचली. विराट कोहलीने ५२वं वनडे शतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. यादरम्यान सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर विराट काय म्हणाला, जाणून घेऊया.

विराट कोहली म्हणाला, “आज अशा पद्धतीने सामन्यात योगदान देता आलं, हीच खूप छान गोष्ट होती. पहिले २०–२५ षटकं खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, त्यानंतर विकेट स्लो होत लागली. मला फक्त येणारा चेंडू खेळत क्रिकेटचा आनंद घ्यायचा होता. चांगली सुरुवात मिळाल्यावर अनुभव आपोआप कामी येतो आणि डाव साकारण्यासाठी मदत होते.”

विराट कोहली सरावबाबत पुढे म्हणाला, “मी जास्त सरावावर विश्वास ठेवणारा खेळाडू नाही. माझं बहुतेक क्रिकेट मानसिक तयारीवरच चालतं. शारीरिकदृष्ट्या मी खूप मेहनत करतो, फिटनेस चांगला असेल आणि फलंदाजीची तयारी मनात स्पष्ट असेल, तर सगळं ठीक होतं.”

विराट कोहली कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणार का? स्वत: दिलं उत्तर

तितक्यात हर्षा भोगले यांनी विराटला विचारलं की तू ‘रांचीमध्ये लवकर पोहोचला होतास’, यावर उत्तर देताना कोहली म्हणाला, “हो रांचीतील परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचं होतं. सामन्याच्या आधी मी एक दिवस विश्रांती घेतली होती. मी ३७ वर्षांचा आहे आणि रिकव्हरीला वेळ लागतो. आता मी फक्त एकच फॉरमॅट खेळत राहणार आहे. मी जेव्हा सामन्याचा विचार करतो तेव्हा खेळ डोक्यात तयार करत असतो. जर मी तयार व लक्ष केंद्रीत करण्याच्या अवस्थेत आहे असं मला जाणवतो, तेव्हा मी मैदानात जाऊन सहज आणि रिलॅक्स होऊन खेळू शकतो, हे मला माहित असतं. मी सामन्याच्या एक दिवस आधी सुट्टी घेतली होती.”

“३०० हून अधिक वनडे आणि गेली १५ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर, नेटमध्ये एक–दोन तास फलंदाजी जरी केली तरी कळतं, की आपण टचमध्ये आहे की नाही. जर फॉर्ममध्ये असाल तर थोडा सराव पुरेसा असतो; फॉर्म नसला की नेटमध्ये जास्त वेळ घालवाव वाटतो. फक्त एवढंच महत्त्वाचं असतं, शारीरिकदृष्ट्या फिट असणं, मानसिकदृष्ट्या तयार असणं आणि खेळण्यासाठी उत्साहित असणं,” असं विराट अखेरीस म्हणाला.

2025-11-30T17:35:17Z