विम्बल्डन विजेत्या युजीन बोचार्डनं टेनिस सोडून पिकल बॉलला जवळ का केलं? या खेळाबद्दल तिला काय वाटतं?

पिकलबॉल हा खेळ सध्या जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळांचं मिश्रण असलेला हा खेळ सर्वच वयोगटांत आवडीने खेळला जात आहे. भारतातही पिकलबॉलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. खेळायला सोपा असल्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण पिकलबॉलकडे आकर्षित होताना दिसत आहेत. अशातच विम्बलडन स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळलेली खेळाडू युजीन बोचार्ड हिने टेनिस सोडून पिकल बॉलची निवड केली आहे, यामागचं कारण तिने आता सांगितलं आहे.

आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय असल्याचं तिने स्पष्ट केलं. ‘द किचन पिकलबॉल’शी बोलताना बोचार्ड म्हणाली, “२०२३ मध्ये यूएस ओपनच्या वेळेस याबाबत चर्चा सुरू झाली होती. माझे एजंट्स माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की PPA (प्रोफेशनल पिकलबॉल असोसिएशन) काही टेनिस खेळाडूंना पिकलबॉलकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.”

तात्काळ निर्णय न घेता, आयुष्यातील दीर्घकाळ टेनिससाठी दिल्यामुळे तिने या संधीबाबत वेळ घेऊन निर्णय घेतला. ती म्हणाली, “मी यावर शांतपणे विचार केला. मी बराच काळ व्यावसायिक टेनिस खेळत आली होती.” जीवनशैलीच्या दृष्टीनेही हा बदल महत्त्वाचा ठरल्याचं बोचार्डने सांगितलं “फक्त अमेरिकेतच प्रवास करणं आणि काहीतरी नवीन करण्याची संधी असं, याचं आकर्षण नक्कीच वाटलं,” असं बोचार्ड म्हणाली.

जवळपास २५ वर्षे टेनिस खेळल्यानंतर, नवीन खेळ शिकण्याचं आव्हानही तिच्यासाठी प्रेरणादायी ठरलं. “२५ वर्षे टेनिस खेळल्यानंतर, नवीन कौशल्य आत्मसात करण्याचं आव्हान स्वीकारणं, हेच मला पुढे जाण्यासाठी महत्त्वाचं वाटलं.” पिकलबॉलचा झपाट्याने होत असलेला विस्तार हा निर्णय घेण्यामागचा महत्त्वाचा घटक असल्याचं बोचार्डने सांगितलं. ती म्हणाली, “पिकलबॉल हा सध्या सर्वात वेगाने विस्तार होणाऱ्या खेळांपैकी एक आहे. एवढ्या झपाट्याने पुढे जाणाऱ्या खेळाचा भाग होणं आणि त्या प्रवाहात सहभागी होणं योग्य वाटलं,” असं ती म्हणाली.

पिकलबॉलच्या विकास प्रक्रियेचा भाग होण्याची संधीच अखेरीस टेनिस सोडून या खेळाकडे वळण्यासाठी निर्णायक ठरली. “या खेळाच्या प्रवासाचा एक भाग होण्याची संधी मला खूपच आकर्षक वाटली,” असं बोचार्डने स्पष्ट केलं. टेनिस सोडून पिकल बॉलकडे वळताना फारसा विचार न करता संधी स्वीकारण्यावर भर दिल्याचंही तिने सांगितलं. “मी फक्त एवढंच ठरवलं, का नाही? संधी आहे तर प्रयत्न करून पाहूया,” अशा शब्दांत तिने आपल्या निर्णयामागची भूमिका मांडली.

2026-01-08T10:35:17Z