भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही जगातल्या आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. अव्वल दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध दमदार खेळी करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. फलंदाजीच्या बरोबरीने नेतृत्वाचा काटेरी मुकूटही ती शिताफीने हाताळते. मात्र याच हरमप्रीतला एका तडाखेबंद षटकारासाठी चक्क डोपिंग टेस्टला सामोरं जावं लागलं होतं.
ही घटना आहे २००९ वर्ल्डकपमधली. भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. १९ वर्षीय हरमनप्रीत त्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आली होती. भारतीय संघ ४७व्या ओव्हरमध्ये २०१/५ अशा स्थितीत होता. त्यांना हरमनप्रीतकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. हरमनने ८ चेंडूत २ चौकार आणि एका तडाखेबंद षटकारासह नाबाद १९ धावांची खेळी केली. ४८व्या ओव्हरमधला पाचवा चेंडू तिने मिडविकेटच्या बाहेर भिरकावून दिला. हरमनप्रीतच्या ताकदीमुळे चेंडू नॉर्थ सिडनी ओव्हल स्टेडियमच्या छतावर जाऊन आदळला. हा षटकार पाहून उपस्थित चाहते आश्चर्यचकित झाले. महिला क्रिकेटमधला तो सगळ्यात पल्लेदार षटकार होता अशी चर्चा झाली मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
भारताने २३४ धावांची मजल मारली. अंजुम चोप्राने ७६ धावांची शानदार खेळी केली. अनघा देशपांडेने ४५ तर मिताली राजने ४४ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाला २१८ धावाच करता आल्या. अॅलेक्स ब्लॅकवेलने ५४ धावा केल्या. जोडी फिल्ड्सने ४३ तर लॉरेन इब्सरीने ३९ धावा केल्या मात्र त्या अपुऱ्या ठरल्या. हरमनप्रीतने शेवटच्या ओव्हर्समध्येय येऊन केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली. पण मुलगी एवढा प्रचंड षटकार कसा लगावू शकते याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. १९वर्षीय हरमनप्रीतला डोपिंग टेस्टला सामोरं जावं लागलं. डोपिंग टेस्ट झाली आणि त्याचा निकाल निगेटिव्ह आला. हरमनप्रीतची ताकद काय याचा प्रत्यय जागतिक क्रिकेटला तेव्हाच आला. हरमनची डोप टेस्ट घेऊन भागलं नाही तर तिच्या बॅटची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तिथेही काही हाती लागलं नाही.
या घटनेनंतर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हरमनप्रीतने डोपिंग टेस्टच्या वृत्त खरं असल्याचं स्पष्ट केलं. तो षटकार कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. मुलगी एवढा जोरदार षटकार लगावू शकतो यावर कोणी विश्वासच ठेवला नाही. असा षटकार मारण्यासाठी किंवा तत्सम स्वरुपाची फटकेबाजी करण्यासाठी मी ऊर्जासंवर्धक ड्रग्ज घेतले असावेत अशी शंका व्यक्त करण्यात आली. मी डोप टेस्टला सामोरी गेले. माझ्या नैसर्गिक ताकदीच्या बळावरच तो षटकार लगावल्याचं स्पष्ट झालं.
पंजाबमधील मोगामध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिला क्रिकेटची आवड होती. हरमनचे वडील हरमिंदर सिंह भुल्लरसुद्धा क्रिकेट खेळत असत. तिने तिच्या वडिलांना चौकार षटकार लगावताना पाहिलं होतं. तेव्हाच तिला या खेळाची आवड निर्माण झाली होती.मोगामध्ये ती मुलींच्या मैदानात कमी आणि मुलांबरोबर क्रिकेट खेळतानाच जास्त दिसायची. हरमनप्रीत ज्या पद्धतीने गोलंदाजांची धुलाई करते ते पाहून प्रशिक्षकांनी त्यांच्या शाळेत दाखल करून घेतलं. मोगासारख्या छोट्या गावात तिचं खेळणं अनेकांना पसंत पडलं नाही. पंजाब आणि रेल्वेतर्फे खेळल्यानंतर १९व्या वर्षी २००९मध्ये तिने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं.
वर्ल्डकप स्पर्धेत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच १७१ धावांची अफलातून खेळी साकारली होती. वनडे क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान खेळींमध्ये त्या खेळीचा समावेश होता. स्लॉग स्वीप आणि डाऊद द ट्रॅक येत गोलंदाजांच्या डोक्यावरून साईटस्क्रीनपल्याड चेंडू भिरकावून देण्यात हरमनप्रीतचा हातखंडा आहे. आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग सुरू झाली. बिग बॅश ही पुरुषांप्रमाणेच महिलांचीही खेळवण्यात येते. बिग बॅश लीग स्पर्धेत खेळणारी हरमनप्रीत ही पहिली भारतीय खेळाडू आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्याने चांगलं खेळत असल्याने तिथल्या संघांनी हरमनप्रीतला ताफ्यात समाविष्ट करण्यात उत्सुकता दाखवली. सिडनी थंडर संघाने हरमप्रीतला ताफ्यात दाखल करून घेतलं. जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हरमनप्रीतने ३१ चेंडूत ४६ धावांची खणखणीत खेळी साकारत संघाला थरारक विजय मिळवून दिला होता.
२०१३ मध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध केलेल्या शतकासह हरमनप्रीतने क्रिकेटजगताचं लक्ष वेधून घेतलं. त्याचवर्षी मिताली राजला विश्रांती देण्यात आलेली असताना हरमनप्रीतकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. तीन वर्षांनी कर्णधारपदाची धुरा तिच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून तिने संघाची उत्तम मोट बांधली आहे. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्याकडून चांगला खेळ करवून घेणं, स्वत:मोठी खेळी साकारत संघासमोर वस्तुपाठ सादर करणं, अफलातून क्षेत्ररक्षण, गोलंदाजांशी चर्चा आणि अपेक्षित यश न मिळाल्यास त्यांचा हुरुप वाढवणं या सगळ्या गोष्टी हरमनप्रीत नेटाने करते आहे. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधली कामगिरी सुधारली. भारताची परदेशातली कामगिरीतही अमूलाग्र सुधारणा झाली आहे. २०२० मध्ये टी२० वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वातच भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.
तिने ६ टेस्ट, १५९ वनडे आणि १८२ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
2025-11-02T14:50:15Z