निवृत्त झाल्यावर आपल्या मनासारखं जगायचं असं अनेकजण ठरवतात. पण प्रत्यक्षात मात्र पुन्हा कशात तरी गुरफटत राहतात आणि मग आयुष्याची सेकंड इनिंगही मनासारखी जगता आली नाही म्हणून कुरकुर करतात, पण नव्या इनिंगला सामोरे जाताना कात टाकणारेही काहीजण आहेत. ७४ वर्षांच्या दक्षा दिलीप कानविया या त्यांपैकीच एक.
जबाबदारीचे ओझे कायमच बाळगणाऱ्या दक्षा यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी पायात पहिल्यांदा धावण्याचे शूज घातले, ते स्वत:साठी. कोणतीही मॅरेथॉन जिंकण्याचा त्यांचा अजिबातच हेतू नव्हता. किंवा ‘या वयातही बघा ही बाई किती धावते,’ अशा कौतुकाचीही त्यांना अपेक्षा नव्हती. स्वत:च्या आरोग्यासाठी स्वत:लाच उभं राहावं लागेल हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे व्यायाम हा आपल्या नियमित दिनचर्येतील अविभाज्य भाग असेल हेही त्यांनी ठरवलं होतं. त्याआधी कितीतरी वर्षे त्यांना हाडे आणि स्नायूंच्या दुखण्याने बेजार झाल्या होत्या. नियमित व्यायाम हाच यावरचा उपाय आहे हे त्यांना कळलेलं होतं.
दक्षा यांचं रनिंग गरज म्हणून सुरू झालं होतं. पण हळूहळू ती त्यांची सवय झाली. दक्षा आता ७४ वर्षांच्या आहेत. २०२५ मध्ये नुकत्याच झालेल्या पिंकेथॉनमध्ये ५० किलोमीटरच्या विभागात मॅस्कॉट म्हणून सहभागी झाल्या होत्या. महिला आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पिंकेथॉनचे आयोजन केले जाते. तुमची इच्छाशक्ती असेल तर वय किंवा शारीरिक दुखणं या गोष्टी अडथळा ठरत नाहीत हे दक्षा यांनी दाखवून दिलं.
शाळेत असल्यापासून दक्षा यांना खेळाची आवड होती. अनेक स्पर्धांमध्ये त्या सहभागीही झाल्या होत्या. शिस्त आणि कठोर मेहनत या दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वभावातच होत्या. खरेतर खेळातच त्यांनी पुढे काहीतरी केले असते. पण परिस्थितीमुळे खूप लवकर आर्थिक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर काम करायलाही त्यांनी सुरूवात केली.
सकाळी कॉलेजचा अभ्यासही सुरू होता. पण पुढे सांसरिक जबाबदाऱ्या वाढतच गेल्या. नोकरीबरोबरच लग्न मग मुलं, संसार हे सगळं करता करता स्वत:साठी वेळ देणं, स्वत:कडे बघणंही त्या काही काळ विसरून गेल्या होत्या. आपल्याकडे असंख्य स्त्रिया कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपलं स्वत:चं अस्तित्व विसरून जातात. शरीर थकलं की तक्रार करू लागतं आणि मग तेव्हा आपल्या आरोग्याचं, फिटनेसचं महत्व लक्षात येतं. महत्वाचं म्हणजे दक्षा यांनी हे लक्षात आल्यावर त्यावर लगेचच काम करायला सुरुवात केली होती.
धावणं सुरू तर केलं, पण मॅरेथॉनपर्यंतचा प्रवास दक्षा यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. आतापर्यंतच्या आयुष्यात केलेल्या कष्टांमुळे शरीर थकलं होतं. त्यामुळे त्यांना हाडांचे दुखणे (osteoporosis) सुरु झालं. चालता येणंही अवघड झालं होतं. डॉक्टरांनी फिजिओथेरपी आणि हळूहळू चालण्याचा सराव सुरू करण्याचा सल्ला दिला होता. ते चालणंही दक्षा यांच्यासाठी खूप कठीण होतं. मात्र आपल्याला यावर मात करायची आहे, या दुखण्यातून बरं व्हायचं आहे, इतकंच त्यांनी त्यावेळेस ठरवलं होतं.
मॅरेथॉन वगैरेचा विचारही त्यांच्या मनात नव्हता. २०१५ साली एका वॉक घेताना त्यांची पिंकेथॉनमधील काही जणांशी ओळख झाली. त्यातील महिलांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि मग त्यांनी धावण्याचं ठरवलं. खरं तर हे त्यांच्यासाठी तेव्हा अशक्य होतं. पण तरीही मनातल्या उर्मीमुळे त्यांनी रनिंगला सुरुवात केली. तेव्हापासून ते मॅरेथॉनपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात प्रचंड मेहनत तर आहेच, पण सातत्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्या दररोज योगाभ्यास तर करतातच पण लाँग वॉक किंवा रनिंगही करतात.
दररोज साधारणपणे १० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे. भरपूर अडचणीही त्यांच्या वाटेत आल्या. त्यांचा सायटीकाचा आणि मणक्याचा त्रास चांगलाच वाढला. तब्बल दोन महिने त्यांना बेडवर पडून सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण त्या खचल्या नाहीत. पुरेशी विश्रांती घेऊन त्यातून बरं होऊन मग हळूहळू पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली. पूर्ण बरं झाल्यावर मात्र त्या थांबल्या नाहीत. आपण एकदम १०० किलोमीटर धावू शकणार नाही हे त्यांना माहिती होतं. मग त्यांनी ५० किलोमीटर धावण्यापासून सुरुवात केली.
२१ किलोमीटरऐवजी फक्त १० किलोमीटर चालण्याचा सराव केला. मनापासून ठरवलं की एक स्त्री काय करू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. “वाढत्या वयामुळे शरीर थकणार, काही ना काही कुरबुरी करणार. पण कंटाळून आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं बंद करू नका. शरीर काय म्हणतंय ते ऐकण्याचा प्रयत्न करा.” असा त्यांचा मंत्र आहे. या वयात सतत तक्रारी करत बसण्यापेक्षा त्यांनी बदल स्वीकारला. त्यामुळेच आतापर्यंत त्यांनी मुंबई ते पुणे, अमृतसर ते वाघा बॉर्डर, ग्वाल्हेर ते दिल्ली अशा धावण्याच्या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
चालणं किंवा धावण्यामागचा त्यांचा हेतू हा पूर्णपणे वैयक्तिक होता. पण सातत्य, कुरकुर करत एका जागी बसून राहण्यापेक्षा हालचाल करत राहणे आणि मोकळेपणाने त्या बदलाला सामोरे गेल्या. त्यामुळेच वयाच्या ७४ व्या वर्षीही दक्षा आजी एखाद्या तरुणीच्या उत्साहाने धावतात. पण त्याचवेळेस आपल्या वयाला आहे तसं त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळेच त्या वयापासून दूर न पळताही कितीतरी किलोमीटर धावू शकतात.
2026-01-08T07:50:15Z