AMOL MUZUMDAR: खंत नाही, खचलो नाही, जिथे गेलो तिकडे दुनिया बनवली – अमोल मुझुमदार

Amol Muzumdar Exclusive: भारतीय महिला क्रिकेट २०२५ हे वर्ष कधीच विसरू शकणार नाही. कारण गेल्या ५२ वर्षांपासून भारतीय महिला खेळाडू ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण याच वर्षी पाहायला मिळाला. महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारताने पहिल्यादांच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. मुंबईकर अमोल मुझुमदार यांनी या विजयात मोलाचं योगदान दिलं. जे इतर कुठल्याही प्रशिक्षकाला जमलं नव्हतं. ते अमोल मुझुमदार यांनी करून दाखवलं. दरम्यान लोकसत्ता गप्पा या कार्यक्रमात बोलताना अमोल मुझुमदार यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आठवणीतील किस्सा सांगितला.

अमोल मुझुमदार हे नाव देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुफान चर्चेत राहिलं. पण अमोल मुझुमदारांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १११६७ धावा आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३२८६ धावा करूनही जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची वेळ आली. त्यावेळी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे दिग्गज खेळाडू मैदानात होते. त्यामुळे अमोल मुझुमदारांना खेळण्याची संधी मिळाली नाही.

संधी मिळत नव्हती, पण मी ठरवलं होतं की, मला क्रिकेट खेळायचंय. लोकसत्ता गप्पा या कार्यक्रमात बोलताना अमोल मुझुमदार म्हणाले, “खंत नाही आणि खचलो ही नाही. मी ठरवलं होतं की, मला क्रिकेट खेळायचंय. मला जिथे क्रिकेट खेळायला मिळेल मी खेळत होतो. ऑफिसची टीम असेल, क्लबची टीम असेल किंवा इंग्लंडमध्ये जायचो ती टीम असेल. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जे त्यावेळी खेळत होते, ते ग्रेट होते. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड. मला खंत कधीच वाटली नाही. खचलो नाही, जिथे गेलो तिकडे दुनिया बनवली.”

2025-11-29T14:05:15Z