Ayush Mhatre breaks Rohit Sharma Record: मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. १८ वर्षीय आयुष म्हात्रेची दुबई येथे १२ डिसेंबरपासून होणाऱ्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय कर्णधार म्हणून निवड झाली आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी या स्पर्धेत डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे. दरम्यान या स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत दमदार शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.
आयुष म्हात्रेने विदर्भ संघाविरुद्ध ४९ चेंडूत शतक झळकवताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हे त्याचं टी -२० क्रिकेटमधील पहिलंच शतक ठरलं. यासह तो प्रथम श्रेणी क्रिकेट, लिस्ट ए क्रिकेट आणि टी -२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा विक्रम मोडून काढला आहे. रोहित शर्माने हा पराक्रम वय १९ वर्षे ३३९ दिवस इतकं असताना केला होता. आयुष म्हात्रेच्या या दमदार शतकी खेळीच्या बळावर मुंबईने विदर्भाने दिलेलं १९४ धावांचे आव्हान १३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले.
असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
आयुष म्हात्रे हा देशांतर्गत क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. आयुष म्हात्रेने हा पराक्रम वयाच्या १८ व्या (१८ वर्ष १३५ दिवस) वर्षी करून दाखवला आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या रोहित शर्माने १९ वर्ष ३३९ दिवस असताना हा पराक्रम केला होता. भारतीय संघाला अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देणारा उन्मुक्त चंद या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी हा विक्रम आपल्या नावावर केला. तर क्विंटन डी कॉकने २० वर्ष ६२ दिवस इतकं वय असताना हा पराक्रम केला होता.
सर्वात कमी वयात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारे भारतीय फलंदाज
आयुष म्हात्रे – १८ वर्षे १३५ दिवस
रोहित शर्मा – १९ वर्षे ३३९ दिवस
उन्मुक्त चंद – २० वर्षेक्विंटन डी कॉक – २० वर्षे ६३ दिवस
अहमद शहजाद – २० वर्षे ९७ दिवस.
2025-11-29T03:05:12Z