IND VS NZ: पहिल्याच सामन्यात विराट इतिहास घडवणार? सचिनचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी

Virat Kohli Record: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने लागोपाठ शतकं झळकावली होती. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत त्याला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.

विराट कोहलीने कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ एकच फॉरमॅट खेळत आहे. पण एक फॉरमॅट खेळत असूनही त्याच्या फलंदाजीतील धार कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याने लागोपाठ शतकं आणि १ अर्धशतक झळकावत दमदार पुनरागमन केलं. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७,९७५ धावा केल्या आहेत. त्याला २८,००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या २५ धावांची गरज आहे. विराट न्यूझीलंडविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या ३ सामन्यांमध्ये किंवा जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याने या २५ धावा केल्या तरीदेखील तो सचिनचा मोठा विक्रम मोडून काढून शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २८,००० धावांचा पल्ला गाठणारा विराट पहिलाच फलंदाज ठरू शकतो. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या सचिन तेंडुलकरने ६४४ डावात २८,००० धावांचा पल्ला गाठला होता. तर विराटने आतापर्यंत ६२३ डावात २७,९७५ धावा केल्या आहेत. त्यामुळे २५ धावा करताच तो सर्वात जलद २८,००० धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. विराटने सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील विराटने सचिनचा वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. सचिनच्या नावे ४९ शतकं झळकावण्याची नोंद होती. विराटने २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत हा विक्रम मोडून काढला होता. विराटच्या नावे आता ५३ शतकं झळकावण्याची नोंद आहे.

2026-01-09T14:35:11Z