IND VS SA: रोहित-विराटच्या जोडीचा अनोखा विक्रम, सचिन-द्रविडला मागे टाकत अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय जोडी

Rohit Sharma Virat Kohli Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना आज रांचीमध्ये खेळवला जात आहे. सामन्याची नाणेफेक दक्षिण आफ्रिकेने जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालला सलामीची संधी मिळाली. तर श्रेयस अय्यरच्या जागी ऋतुराज गायकवाडला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे. या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहलीने मैदानावर उतरताच इतिहास रचत मोठा विक्रम आपल्या नावे केला.

रोहित शर्मा व यशस्वी जैस्वालची जोडी या सामन्यात सलामीला उतरली. वेगवान सुरूवातीनंतर यशस्वी जैस्वाल १८ धावा करत बाद झाला. यानंतर रोहित शर्मा व विराट कोहलीची जोडी मैदानावर आहे. अर्धशतकी भागीदारी रचत रोहित-विराटच्या जोडीने संघाचा डाव सावरला आहे. या सामन्यात खेळण्यासाठी उतरताच रोहित विराटने सचिन-द्रविडला मागे टाकत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्मा व विराट कोहली हे दोघे एकत्र त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील ३९२वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक सामने खेळणारी भारतीय जोडी ठरली आहे. आतापर्यंत हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता, ज्यांनी एकत्र ३९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पण आता, हिटमॅन आणि किंग कोहली ही भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी आणि सर्वात जास्त काळ खेळणारी जोडी ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र सर्वाधिक सामने भारतीय खेळाडूंच्या जोड्या

रोहित शर्मा आणि विराट कोहली – ३९२

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड – ३९१

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली – ३६९

सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे – ३६७

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली – ३४१

रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने गेल्या दशकात भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर नेलं आहे, विश्वचषक, आशिया चषक किंवा मग परदेशातील दौरे असूदेत. रोहित-विराटचं नेतृत्त्व व त्यांचा अनुभव कायमच संघासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या गेल्या वनडे मालिकेत या दोघांनीही उत्कृष्ट भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला होता.

2025-11-30T09:35:13Z