IPL 2026: भारतानं खूप प्रेम दिलं, आता पाकिस्तानात…, ‘हा’ खेळाडू १४ वर्षांनंतर IPL सोडून आता PSL मध्ये खेळणार

IPL 2026 Faf Du Plessis Shared Post: आयपीएल २०२६ साठी रिटेन्शनची प्रक्रिया पार पडली आहे आणि सर्व संघांनी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सकडे सादर केल्या आहेत. पुढील हंगामासाठीचा लिलाव येत्या १६ डिसेंबरला होणार आहे. यादरम्यान तब्बल १४ वर्षे आयपीएल खेळलेल्या खेळाडूने आयपीएल २०२६ मधून माघार घेतली आहे. त्याने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

आयपीएलमधील प्रसिद्ध फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार असलेला फाफ डू प्लेसिसने ऑक्शनमधून माघार घेतली आहे. यासह तो आयपीएल २०२६ च्या पुढील हंगामाग खेळताना दिसणार नाही. यादरम्यान त्याने पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे.

गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या फाफ डू प्लेसिसला संघाने रिलीज केलं होतं आणि तो लिलावात सहभागी होणार होता. आता त्याने एक निवेदन जारी करत स्पर्धेचे १४ हंगाम खेळल्यानंतर, या वर्षी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय होता आणि मागे वळून पाहताना मला खूप कृतज्ञता वाटते. ही लीग माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे, असंही तो म्हणाला.

फाफ डू प्लेसिस निवेदनात म्हणाला, “आयपीएलमध्ये १४ वर्षे खेळल्यानंतर, मी या वर्षी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय आहे आणि मोठ्या कृतज्ञतेने घेतला आहे. ही लीग माझ्या प्रवासाचा एक मोठा भाग आहे. जागतिक दर्जाच्या संघातील खेळाडू, एक उत्तम फ्रँचायझी आणि अविश्वसनीय उत्साही चाहत्यांबरोबर आणि त्यांच्यासमोर खेळण्याचे भाग्य मला लाभले आहे.”

पुढे फाफ म्हणाला, “१४ वर्षे हा खूप मोठा काळ आहे आणि या यशाचा मला अभिमान आहे. माझ्या हृदयात भारताचे एक विशेष स्थान आहे आणि हा निश्चितच निरोप नाही. तुम्ही मला पुन्हा भेटाल. या वर्षी मी एक नवीन आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि पीएसएलच्या आगामी हंगामात खेळेन.”

चेन्नई सुपर किंग्जकडून दोनदा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा डू प्लेसिस गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता पण यावेळी फ्रँचायझीने त्याला लिलावापूर्वीच सोडले. यानंतर, ४० वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूने हा निर्णय घेतला आहे. फाफची आयपीएल कारकिर्द कमालीची होती. त्याने २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले, सात हंगाम त्यांच्याकडून खेळला आणि २०१८ आणि २०२१ मध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता.

फाफ रायझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला आहे. त्याने १५४ सामन्यांमध्ये ४,७७३ धावा केल्या आहेत, ज्यात ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.

2025-11-29T16:35:09Z