VIJAY HAJARE CRICKET TROPHY : नाशिकचा सीएसके स्टार भलताच कंजुष… शेवटचे षटक ०, ०, ०, ०, ०, ० असे टाकत गोव्याला केले पराभूत, ऋतुराज गायकवाड खूष

नाशिक – २०२५-२६ या वर्षाच्या विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धेच्या बाद फेरीत पोहचण्यात महाराष्ट्राला अपयश आले असले तरी महाराष्ट्राने प्रत्येक समान्यात दिलेली झूंज प्रत्येकाच्या लक्षात राहील अशीच आहे. त्यातही काही नवोदित खेळाडूंची कामगिरी थक्क करणारी झाली. त्यात २०२६ च्या आयपीएल स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने कायम ठेवलेल्या नाशिकच्या अष्टपैलू खेळाडूचा विशेष उल्लेख करावा लागेल. विजय हजारे क्रिकेट चषक स्पर्धा या खेळाडूसाठी स्वप्नवत राहिली. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राला गोव्यावर अवघ्या पाच धावांनी विजय मिळविता आला. त्याचे सर्व श्रेय नाशिकच्या या खेळाडूला दिले जात आहे. गोव्याला विजयासाठी शेवटच्या षटकात सहा धावांची गरज असताना नाशिकच्या या अष्टपैलू खेळाडूने संपूर्ण सहा चेंडूत एकही धाव न देता निर्धाव षटक टाकून महाराष्ट्राला थरारक पध्दतीने पाच धावांनी विजय मिळवून देत शेवटच्या सामन्यातही आपली छाप पाडली.

विजय हजारे चषक स्पर्धेच्या एलीट ग्रुप सी मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात महाराष्ट्राने गोव्याला पाच धावांनी हरवले. कमालीच्या दबावाखाली नाशिकचा अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोषने शेवटच्या षटकात उत्कृष्ट लाईन आणि लेंग्थचे प्रदर्शन करुन फलंदाजांना एकही धाव घेण्याची संधी दिली नाही.

रामकृष्ण घोष आयपीएल २०२६ स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड यांच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा (सीएसके) भाग आहे. मागील वर्षाच्या आयपीएलमध्येही म्हणजेच २०२५ मध्येही रामकृष्ण घोष सीएसके संघातच होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, आयपीएलनंतर देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये रामकृष्ण घोषने केलेल्या कामगिरीमुळे २०२६ वर्षीच्या आयपीएलएमध्ये रामकृष्ण घोष सीएसकेचा प्रमुख खेळाडू राहील, असा विश्वास त्याने सर्वांनाच दिला आहे. विशेष म्हणजे, सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असल्याने आयपीएल स्पर्धेत रामकृष्ण घोषला त्याचा फायदा होणारआहे.

रामकृष्ण घोषने गोव्याच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिसकावून घेतला. विजय हजारे चषक स्पर्धेतील महाराष्ट्राचे आव्हान आधीच संपले होते. परंतु, शेवटच्या सामन्यात संघाची प्रतिष्ठा जपायची होती. गोव्याविरुध्दच्या सामन्यात महाराष्ट्राने ५० षटकांत सात बाद २४९ धावा केल्या. त्यात ऋतुराज गायकवाडच्या खणखणीत १३४ धावा होत्या. प्रत्युत्तरादाखल गोव्याने चांगल्या सुरुवातीनंतर पटापट गडी गमावल्याने संघाची अवस्था २२१ धावांवर नऊ बाद अशी झाली. त्यावेळी ललित यादवने किल्ला सांभाळण्याचे काम केले. त्यास वासुकी कौशिकने साथ दिली. यादव-कौशिक जोडी गोव्याला विजय मिळवून देणार, अशी चिन्हे होती.

सान्याचे शेवटचे षटक उरले होते. अशावेळी महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाशिकच्या रामकृष्ण घोषच्या हातात चेंडू दिला. कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी रामकृष्ण घोषवर आली होती. गोव्याला विजयासाठी फक्त सहा धावांची गरज होती. रामकृष्णने दबावाखाली कमालीची गोलंदाजी करताना संपूर्ण षटकात एकही धाव दिली नाही. ०,०,०, ०, ०, ० असे षटक टाकून रामकृष्ण घोषने महाराष्ट्राला पाच धावांनी विजय मिळवून दिला. रामकृष्ण घोष या सामन्यात सर्वात कंजुष गोलंदाज ठरला. त्याने १० षटकात केवळ ३५ धावा देत एक गडी बाद केला. त्याची सरासरी ३.५० अशी राहिली.

2026-01-09T07:05:14Z