अंगावर धावला, अंपायरला भांडला; जयस्वालच्या विकेटवरून बेन स्टोक्सचा मैदानात राडा

Ben Stokes Angry on Yashasvi Jaiswal : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाने पहिल्या इनिंगमध्ये 180 धावांची मोठी आघाडी घेतली होती. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 587 रन्स केले होते, तर इंग्लंडचा संघ 407 रन्सवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जॅमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी सेंच्युरी मारली, ज्यामुळे त्यांना 400 प्लस रन्स करता आले. मात्र, या मॅचमध्ये त्यानंतर एक वेगळंच नाट्य घडलं, जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आणि बेन स्टोक्स अंपायर्सशी भिडले.

जयस्वालच्या विकेटवरून राडा

भारताच्या दुसऱ्या इनिंगमधील 7 वी ओव्हर जोस टंग टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जयस्वालला बॉलची लाईन आणि लेंग्थ अजिबात कळाली नाही आणि बॉल त्याच्या पॅडला लागला. इंग्लंडच्या प्लेयर्सनी अपील करताच अंपायरने तात्काळ बोट वर करून त्याला आऊट दिलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण इथून पुढं बेन स्टोक्सने राडा घातला.

बेन स्टोक्स प्रचंड संतापला अन् अंपायरवर धावला

या आऊटनंतर यशस्वी जयस्वालने डीआरएसची (DRS) मागणी केली आणि अंपायरने त्याची रिव्ह्यूची मागणी मान्य केली. हे पाहताच इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स प्रचंड संतापला आणि तो वेगाने अंपायरकडे धावला. रिव्ह्यू घेण्याची वेळ संपली होती आणि जयस्वालने वेळेनंतर रिव्ह्यू मागितला, असं स्टोक्सचं म्हणणं होतं. यावरून स्टोक्सची अंपायर्ससोबत बरीच चर्चा झाली. स्टोक्स आजही रागाने काहीतरी बोलताना दिसला, ज्यामुळे ग्राउंडमध्ये खूप हूटिंग झाली.

पाहा Video

यशस्वी जयस्वालचा एलबीडब्ल्यू 

दरम्यान, या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेरीस रिव्ह्यू घेण्यात आला आणि त्यात बॉल लेग स्टंपला आदळताना दिसला. त्यामुळे थर्ड अंपायरनेही यशस्वी जयस्वालला एलबीडब्ल्यू (LBW) आऊट दिलं. या नाटकीय घडामोडींनंतर विकेट इंग्लंडच्या नावावर जमा झाली आणि इंग्लंडचे प्लेयर्स खुश झाले. जयस्वालने दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 28 रन्स केले, तर पहिल्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 87 रन्सची इनिंग निघाली होती.

2025-07-05T02:33:07Z