आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट काही काळासाठी विश्रांती घेईल. याचं कारण 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरु होत असून, भारतासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू यात सहभागी होतात. तब्बल दोन महिने ही स्पर्धा सुरु राहते आणि यासाठी आतापासूनच प्रशिक्षण, तयारी सुरु झाली आहे. पण भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अजिबात विश्रांतीच्या मूडमध्ये नाही. गौतम गंभीर जून महिन्यात भारताच्या अ संघासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर अ संघासाह परदेश दौऱ्यावर जाणारा पहिला भारतीय प्रशिक्षक होण्याच्या तयारीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआय अ संघ आणि अंडर 19 संघांसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षकांची नियुक्ती करत आहे. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एनसीएमध्ये असताना ज्युनिअर संघांना प्रशिक्षण दिलं होतं. राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर अ संघ आणि अंडर 19 संघाची जबाबदारी लक्ष्मण आणि इतर प्रशिक्षकांकडे सोपवण्यात आली होती.
पण गौतम गंभीर हा ट्रेंड मोडण्याच्या तयारीत आहे. त्याने आपला हेतू बोर्डाला सांगितला आहे. गौतम गंभीरच्या आधी प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल द्रविड किंवा रवी शास्त्री यांच्यापैकी कोणीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असताना अस संघासह दौरा केला नव्हता. गंभीर मात्र यासाठी उत्सुक आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, गंभीर इंग्लंडला फक्त प्रेक्षक म्हणून जाणार की भारत अ संघाच्या प्रशिक्षकपदाचा भाग म्हणून जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ फार चांगली कामगिरी करु शकला नव्हता. दरम्यान गंभीर संघाला पुन्हा त्याच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यास उत्सुक आहे. या कामासाठी कौशल्यवान खेळाडूंचं सखोल विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे.
"गंभीर ऑस्ट्रेलियाहून परतल्यापासून बीसीसीआयशी चर्चा करत आहे. रिझर्व्हमध्ये असणाऱ्या खेळाडूंबाबत चित्र स्पष्ट करण्याच्या हेतूने गौतम गंभीरने भारत 'अ' संघासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे," असं बीसीसीआयच्या एका सूत्राने वृत्तपत्राला सांगितलं. "गंभीरने काही वाइल्ड कार्ड खेळाडूंसाठी आग्रह धरल्यानंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असल्याने, भविष्यात तो अधिक जोर देईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते," असंही सांगितलं जात आहे.
सध्या बोर्ड आयोजित करत असलेल्या भारत 'अ' दौऱ्यांची संख्या पुरेशी नाही असंही गंभीरला वाटत असून, अशा प्रकारच्या आणखी दौऱ्यांचं वेळापत्रक तयार करावे अशी त्याची इच्छा आहे.
"निश्चित झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे भारत 'अ' दौरे पुनरुज्जीवित करणे आहे. द्रविडने एनसीए सोडल्यानंतर मोजक्याच 'अ' मालिका झाल्या आहेत आणि त्या सर्व एका विशिष्ट मालिकेसाठी शॅडो टूर होत्या. गंभीरचाही असा विश्वास आहे की आणखी 'अ' दौरे होण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच तो परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊ इच्छितो," अशी सूत्रांची माहिती आहे.
2025-03-12T11:10:35Z