पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah ICC Test Ranking : भारताच्या स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची आयसीसी कसोटी क्रमवारीत बादशाहत कायम आहे. त्याने करिअरमधील सर्वोत्तम रेटिंग प्राप्त केले आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत बुमराह गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याचे रेटिंग 908 पर्यंत पोहचले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीपूर्वी बुमराह हा सर्वोच्च रेटिंग प्राप्त करणारा भारतीय गोलंदाज बनला होता. त्याने सिडनीत खेळलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दोन बळी घेतले आणि अणखी एक रेटिंग मिळण्यात यशस्वी झाला.
बुमराहला पाठीच्या दुखण्यामुळे सिडनी कसोटीतल्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे, गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा नवव्या स्थानावर आला आहे. तो बुमराहनंतर टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारा दुसरा भारतीय आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने 29 स्थानांची मोठी झेप घेतली. तोही नवव्या स्थानावर पोहचला आहे.
बोलंडने सिडनी कसोटीत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने दोन्ही डावांमध्ये एकूण 10 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 31 धावा देऊन चार, तर दुसऱ्या डावात 45 धावा देऊन सहा विकेट पटकावल्या. बोलंडच्या प्रदर्शनाच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला तिसरी कसोटी जिंकून 10 वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरता आले.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पॅट कमिन्सलाही रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. त्याने सिडनी अंतिम कसोटीत पाच विकेट घेतल्या. ज्याच्या जोरावर त्याने दुसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाला एक स्थानाचा फायदा झाला आहे. तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुखापतग्रस्त जोश हेजलवुड दोन स्थानांच्या तोट्यामुळे चौथ्या स्थानावर घसरला आहे.
2025-01-08T11:40:31Z