बर्मिंघम : कर्णधार शुभमन गिलचं द्विशतक आणि भारतीय बॉलर्सच्या भेदक कामगिरीनंतर दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंड संकटात सापडली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 77/3 असा झाला होता. इंग्लंडची टीम अजूनही 510 रननी पिछाडीवर आहे. हॅरी ब्रुक 30 रनवर तर जो रूट 18 रनवर बॅटिंग करत आहे. भारताकडून आकाश दीपने 2 तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली आहे.
टीम इंडियाचा 587 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर इंग्लंडची सुरूवात खराब झाली. मॅचच्या तिसऱ्या ओव्हरमध्येच आकाश दीपने लागोपाठ 2 बॉलला 2 विकेट घेतल्या. आकाश दीपने बेन डकेट आणि ओली पोप या दोघांनाही शून्य रनवर माघारी धाडलं. यानंतर मोहम्मद सिराजने झॅक क्रॉलीची 19 रनवर विकेट घेतली.
मॅचच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात 310/5 अशी करणाऱ्या टीम इंडियाने 587 रनचा डोंगर उभारला. कर्णधार शुभमन गिलने 269 रनची मॅरेथॉन खेळी केली, तर रवींद्र जडेजाने 89 रन केले. याशिवाय यशस्वी जयस्वालने 87, वॉशिंग्टन सुंदरने 42 आणि करुण नायरने 31 रनची खेळी केली. इंग्लंडकडून शोएब बशीरला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. तर क्रिस वोक्स, जॉश टंग यांनी 2-2 आणि ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी 1-1 विकेट घेतली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता.
लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शतक केल्यानंतर आता गिलने बर्मिंघममधल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये द्विशतकी खेळी केली आहे. असा विक्रम करणारा गिल हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या कोणत्याच कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती. याआधी इंग्लंडच्या भूमीवर कोणत्याही भारतीय कर्णधाराचा सर्वोत्तम स्कोअर 179 रन होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 1990 साली ही खेळी केली होती. यानंतर आता गिलने अझरुद्दीनचा विक्रम मोडीत काढला आहे.
2025-07-03T18:03:06Z