चॅम्पियन्स ट्रॉफी : 'ही' आहेत भारताच्या विजयाची 6 कारणं

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तीही अगदी दिमाखात.

एकही सामना न गमावता भारतानं हे यश मिळवलं. बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला हरवून भारतानं वन डे क्रिकेटच्या या झटपट स्पर्धेत विजय साजरा केला.

टीम इंडियानं असं निर्विवाद वर्चस्व का गाजवलं? यामागे सहा कारणं सांगता येतात.

1. कर्णधार रोहित शर्माची निर्भीड वृत्ती

गेल्या काही वर्षांमध्ये रोहित शर्मानं फलंदाजीत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सलामीवीर म्हणून खेळताना डावाच्या सुरुवातीलाच रोहित प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर हल्ला चढवतो आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यानं तेच केलं आणि फलंदाजीसाठी कठीण असलेल्या पिचवर 100 च्या स्ट्राईकरेटनं रन्स केल्या. विशेषतः फायनलमध्ये त्याच्या आक्रमक खेळीनं भारताच्या विजयाचा पाया घातला.

विजयानंतर रोहित म्हणाला, "आक्रमक खेळ माझा नैसर्गिक खेळ नाही. मात्र, यामुळे टीमला फायदा मिळतो आणि मी टीमला प्राधान्य देतो."

2. विराट कोहलीच्या मॅचविनिंग इनिंग्स

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीनं निर्णायक क्षणी महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्ध दबावाखाली खेळताना त्यानं नाबाद शतक ठोकलं आणि भारताला विजयासोबतच उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.

मग उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची अवस्था 3 बाद 43 अशी झालेली असताना विराटचा अनुभवच कामी आला. त्याची 84 रन्सची खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली.

विराटनं पाच सामन्यांत 54 च्या सरासरीनं 258 धावा केल्या.

3. फिरकी गोलंदाजीचं जाळं

उपांत्य फेरीत जागा निश्चित झाल्यावर भारतानं फिरकी गोलंदाजांवर भर टाकायला सुरुवात केली.

वरुण चक्रवर्ती भारताचं ट्रम्प कार्ड ठरला. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात संधी मिळाल्यावर त्यानं पाच विकेट्स काढल्या.

तर कुलदीप यादवनं पाच सामन्यांत सात विकेट्स काढल्या.

अक्षर आणि जाडेजाला फारशा विकेट्स मिळाल्या नाहीत, पण त्यांनी धावांना लगाम लावत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवला.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

4. आठव्या क्रमांकापर्यंत मजबूत फलंदाजी

या स्पर्धेत श्रेयस अय्यर भारताच्या मधल्या फळीचा आधार बनला.

चौथ्या क्रमांकावर खेळताना बांगलादेशचा एक अपवाद वगळता, बाकीच्या चार सामन्यांत श्रेयसनं महत्त्वाच्या भागीदारी रचल्या.

स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत श्रेयस रचिन रविंद्र पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानं भारताकडून सर्वाधिक म्हणजे पाच सामन्यांत 243 धावा केल्या.

पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल, सहाव्या क्रमांकावर केएल राहुल, सातव्या क्रमांकावर हार्दिक आणि आठव्या क्रमांकावर रविंद्र जाडेजा खेळल्यानं भारतीय फलंदाजी आणखी मजबूत बनली.

त्यामुळेच फायनलमध्ये विराट स्वस्तात बाद झाल्यावरही भारताला धावांचा यशस्वी पाठलाग करता आला.

5. दुबईच्या एकाच मैदानात खेळणं

यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी खरंतर पाकिस्तानात होणार होती, पण सुरक्षेच्या कारणामुळे भारतानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिला.

त्यामुळे भारताचे सामने दुबईत भरवले गेले आणि टीमला प्रवासही करावा लागला नाही. भारताला याचा फायदा झाल्याचं प्रतिस्पर्धी म्हणतायत, पण भारतीय संघाला मात्र ते मान्य नाही.

6. दहा ते चाळीस षटकांदरम्यानची खास रणनीती

कर्णधार रोहित शर्मानं धीम्या खेळपट्टीवर 10 ते 40 षटकांदरम्यान फिरकी गोलंदाजांचा योग्य वापर केला आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना जखडून ठेवलं.

धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनाही चौकार लगावण्यात अडचणी आल्या. पण एकेरी, दुहेरी धावा काढत भारतीय फलंदाजांनी त्याची भरपाई केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

2025-03-10T10:00:57Z