टीम इंडियाने सलग तीन पराभवानंतर असं केलं कमबॅक, जाणून घ्या वर्ल्डकप विजयाचा प्रवास

भारताने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या प्रवासाचा शेवट गोड झाला. पण भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठीच संघर्ष करावा लागला होता. साखळी फेरीत सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने गणित खूपच कठीण झालं होतं. पण न्यूझीलंडला मात दिली आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. भारताला गुणतालिकेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे गुणतालिकेतील टॉपला असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना उपांत्य फेरीत झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 338 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारताने 9 चेंडू राखून गाठलं.

साखळी फेरीत काय झालं?

भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 59 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात पाऊस पडल्याने डीआरएसनुसार 271 धावांच टार्गेट दिलं होतं. पण श्रीलंकेचा संघ 211 धावा करू शकला. त्यानंतर भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला 88 धावांनी पराभूत केलं. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त 247 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा संघ फक्त 159 धावा करू शकला. भारताचा इथपर्यंतचा प्रवास विजयाचा ठरला. पण त्यानंतर भारताला सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 251 धावा दिल्या होत्या. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 48.5 षटकात 3 गडी राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियासमोर भारताने विजयासाठी 330 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमवून 49 षटकात पूर्ण केलं. तर इंग्लंडने भारतासमोर 288 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताला फक्त 284 धावा करता आल्या. हा सामना भारताने फक्त 4 धावांनी गमावला.

न्यूझीलंडविरुद्ध करो या मरोची लढाई

न्यूझीलंडविरुद्धचा सामना करो या मरोची लढाई होती. भारताने या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 340 धावांचं आव्हान ठेवलं. पण पावसामुळे हे टार्गेट 44 षटकात 325 धावांचं करण्यात आलं. हा सामना भराताने 53 धावांनी जिंकला. त्यानंतर शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि प्रत्येकी एक गुण मिळाला.

2025-11-02T19:38:06Z