टॉसला उरले 24 तास, तरी गिल गोंधळात, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये चाललंय काय?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या टेस्ट मॅचला बुधवार 31 जुलैपासून सुरूवात होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे, पण या सामन्यात टीम इंडिया कुणाला संधी देणार? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. मॅचच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार शुभमन गिल याला जसप्रीत बुमराह पाचव्या टेस्टमध्ये खेळणार का नाही? याबाबत प्रश्न विचारण्यात आला, पण यावर गिलने थेट उत्तर देणं टाळलं.

'ओव्हलची खेळपट्टी हिरवी दिसत आहे, उद्या खेळपट्टी कशी असेल? ते आम्ही पाहू. बुमराह खेळणार का नाही, याबाबतचा निर्णय उद्याच घेऊ', असं उत्तर शुभमन गिल याने दिलं आहे. तसंच अर्शदीप सिंगला तयार राहायला सांगितलं आहे, पण प्लेयिंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायची, हे आम्ही उद्या खेळपट्टी पाहूनच ठरवू, असं शुभमन गिल याने सांगितलं आहे.

पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडने प्लेयिंग इलेव्हनमध्ये एकही स्पिनरला संधी दिलेली नाही, याबद्दलही गिलला प्रश्न विचारण्यात आला. आमच्याकडे जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत, असं उत्तर गिलने दिलं.

बुमराहबद्दल सस्पेन्स

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजच्या सुरूवातीलाच बुमराह 5 पैकी 3 मॅच खेळेल, असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे बुमराहने सीरिजची पहिली, तिसरी आणि चौथी मॅच खेळली. आता पाचव्या टेस्टमध्ये बुमराहच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे दोघेही फिट झाले आहेत. प्रसिद्ध कृष्णा यानेही नेटमध्ये जीव तोडून बॉलिंग केली आहे.

ऋषभ पंत बाहेर

चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये क्रिस वोक्सने टाकलेला बॉल ऋषभ पंतच्या पायाला लागला, त्यामुळे पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या दुखापतीमुळे पंत पाचवी टेस्ट खेळू शकणार नाही. पंतऐवजी ध्रुव जुरेल पाचव्या टेस्टमध्ये खेळेल, हे निश्चित मानलं जात आहे.

भारताची संभाव्य प्लेयिंग इलेव्हन

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

2025-07-30T15:18:11Z