दुर्दैवी! राष्ट्रीय तिरंदाजी खेळाडूचा रेल्वेखाली सापडून मृत्यू; स्पर्धेहून परतताना कोटा येथे अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या तिरंदाजीचा राष्ट्रीय खेळाडू अर्जुन सोनवणे (२०) याचा राजस्थानातील कोटा स्टेशनवर रेल्वेतून उतरताना फलाट आणि गाडीच्या सापटीत पडून मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात अर्जुन शिक्षण घेत होता. पंजाबमधील भटिंडा येथे तिरंदाजीच्या आंतरविद्यापीठीय सामन्यात भाग घेण्यासाठी तो टीमसह गेला होता. स्पर्धेनंतर टीम शकूर बस्ती-मुंबई सेंट्रल रेल्वेने एसी स्पेशल डब्यातून मुंबईला परत येत होती. ही रेल्वे शनिवारी रात्री ८:४५ वाजता कोटा जंक्शन वर पोहोचली. यावेळी टीममधील काही सदस्य उतरण्यासाठी दरवाजाकडे आले.

गाडीचा वेग कमी होत असताना अर्जुनचा पाय घसरला आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये तो अडकला. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रात्री अकराच्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतला. अर्जुनचा मृतदेह आज, सोमवारी नाशिकला पोहचणार असल्याचे तिरंदाजी संघटनेच्या मंगला शिंदे यांनी सांगितले. राज्य आणि राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धांमध्ये आठ सुवर्णपदके जिंकली होती. या घटनेने क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रेनवर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

तर दुसरीकडे, सेल्फी काढण्यासाठी मालगाडीवर चढलेल्या १६ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. उल्लंडुरपेट येथील एन सतीश कुमार नावाचा हा मुलगा आपल्या मित्रांसोबत रेल्वे स्टेशनजवळ उभा होता. तिथे एक मालगाडी थांबली होती. या गाडीवर तेल वाहतूक केली जात होती. गाडीच्या डब्यांवर सामान चढवण्यासाठी शिडीसारखी रचना होती. सतीशने याच शिडीचा वापर करून गाडीच्या डब्यावर चढण्याचा निर्णय घेतला. वर पोहोचल्यावर सेल्फी काढताना त्याचा पाय विजेच्या तारेला लागला. उच्च दाबाच्या विजेमुळे त्याला जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला. त्याला गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या. सुरुवातीला उल्लंडुरपेट सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला विल्लुपुरम मेडिकल कॉलेज आणि चेन्नईतील किल्पाऊक सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

2025-11-03T04:01:30Z