पुजारा-रहाणेला रिप्लेस करणार दोन युवा खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाका करणार!

मुंबई : श्रीलंका दौऱ्यानंतर टीम इंडिया सध्या ब्रेकवर आहे, पण या विश्रांतीनंतर टीम इंडिया अत्यंत महत्त्वाच्या सीरिज खेळणार आहे, यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचाही समावेश आहे. 22 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिल आणि सरफराज खानला नक्कीच संधी मिळेल आणि हे दोघं अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतात, असा विश्वास कार्तिकने व्यक्त केला आहे.

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिनेश कार्तिक बोलत होता. 'गिल आणि सरफराज खान यांनी वर्षाच्या सुरूवातीलाच इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. मला वाटतं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही त्यांची निवड होईल आणि ते सर्वोत्तम कामगिरी करतील. हे दोघं पुजारा आणि रहाणेची जागा घेऊ शकतात का नाही, हे येत्या काही दिवसांमध्येच कळेल. भारतीय टीमला मोठी पोकळी भरून काढायची आहे', असं कार्तिक म्हणाला.

सरफराज खानने या वर्षी फेब्रुवारीमध्ये टेस्ट क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या मॅचच्या पहिल्याच इनिंगमध्ये सरफराजने 62 रन तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली होती. तर शुबमन गिलने 2020 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात गिलने पहिल्या इनिंगमध्ये 45 रन केले होते.

शुबमन गिल भारताकडून 25 टेस्ट खेळला आहे, यात 128 रनच्या सर्वोत्तम स्कोअरसह त्याने 1492 रन केले आहेत, ज्यात 4 शतकं आणि 6 अर्धशतकं आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताच्या या सगळ्या सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

2024-09-02T16:42:28Z dg43tfdfdgfd