भारतीय महिला संघाची विजयी मिरवणूक निघणार की नाही? बीसीसीआय ताकही फुंकून पिणार!

भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 1973 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र तेव्हापासून भारतीय संघ जेतेपदासाठी मेहनत घेत होता. भारताला यापूर्वी दोन संधी आली होती. 2005 आणि 2017 साली जेतेपदाने भारताला हुलकावणी घातली. त्यामुळे तिसऱ्यादा काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पण या पर्वात भारतीय क्रिकेट संघाने कोणतीही चूक केली नाही आणि जेतेपदाला गवसणी घातली. 52 वर्षानंतर भारतीय महिला संघाने जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे पुरूष संघाप्रमाणे भारतीय महिला संघाची विजयी मिरवणूक निघेल का? पण या विजयी मिरवणुकीबाबत बीसीसीआयला फार काही घाई नसल्याचं दिसून येत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी टीम इंडियाच्या मिरवणुकीबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. यावरून बीसीसीआयला या मिरवणुकीबाबत फार काही नसल्याचं दिसून येत आहे.

दुबईमध्ये 4 नोव्हेंबरला आयसीसीची बैठक होणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया या बैठकीला उपस्थित राहणार असून मुंबईतून दुबईला रवाना झाले आहेत. यावेळी आयएएनएसशी बोलताना त्यांनी महिला वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक निघणार का? याबाबत चर्चा केली. देवजीत सैकिया यांच्या मते, सध्या विजयी मिरवणुकीची कोणतीही योजना नाही. तसेच आयसीसीच्या बैठकीला उपस्थिती राहण्यासाठी दुबईला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यासोबत बीसीसीआयचे इतर अधिकारी होते. म्हणजेच सध्या तरी बीसीसीआयच्या डोक्यात विजय मिरवणुकीबाबत काहीच नाही. आयपीएल विजेत्या आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बीसीसीआय ताकही फुंकून पित आहे. त्यामुळे मिरवणुकीबाबत काही ठरलं तरी ते दुबईहून पतल्यानंतर त्यावर चर्चा होऊ शकते. पण सध्या तरी तसं काहीच दिसत नाही.

आयसीसीसमोर आशिया कप स्पर्धेचा मुद्दा उचलणार

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं. पण पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याने भारताने सर्वच संबंध तोडून टाकले आहेत. इतकंच काय तर मैदानातही फक्त मल्टी नेशन स्पर्धेतच पाकिस्तानशी सामना केला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीसी आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर ते ट्रॉफीसह स्टेडियममधून निघून गेले. अजूनही भारताला ट्रॉफी मिळाली नसून वाद सुरु आहे. आता दुबईत होणाऱ्या आयसीसी बैठकीत देवजीत सैकिया आशिया कप स्पर्धेचा मुद्दा उचलून धरतील. या बैठकीनंतर भारताला ट्रॉफी योग्य आदर आणि सन्मानाने मिळेल असंच दिसत आहे.

2025-11-03T10:53:06Z