नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघानं अखेर विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे.
फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत भारतानं हे जगज्जेतेपद मिळवलं आहे.
संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी संमिश्र अशी राहिल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला दोन सामन्यांत विजयानंतर सलग तीन पराभवानंतर संघावर टीकाही झाली.
पण त्यानंतरही संघानं फायनलपर्यंत पोहोचत स्पर्धेत कोणत्या इराद्यानं उतरलो आहोत, हे दाखवून दिलं. पण खरी परीक्षा फायनलमध्येच होती.
बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान कसं मोडून काढायचं याच विचारात असताना संघातील काही खास खेळाडुंनी पुढं येत ती कामगिरी फत्ते केली.
खरं तर क्रिकेटमध्ये कामगिरी सांघिकच असते. पण तरीही या फायनलमध्ये विजयाचा पाया रचून त्यावर कळस चढवणाऱ्या त्या 6 जणी कोण होत्या, हे आपण जाणून घेणार आहोत.
तर सुरुवात करुयात मॅच ऑफ द प्लेयरपासून.
भारताची सलामीची बॅटर प्रतिका रावल जखमी झाल्यानं शेफाली वर्माची अगदी ऐनवेळी संघात वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. ऑस्ट्रेलिया विरोधातील उपांत्य सामन्यात ती खेळणार होती.
सलामीवीर म्हणून तिची वर्णी लागली. विश्वचषकात खेळायला मिळणार समजल्यानंतर, कदाचित आपल्याला देवानं काहीतरी खास करायसाठी पाठवलं असावं, असं तिनं माध्यमांसमोर अगदी मोकळेपणानं सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील उपांत्य सामन्यात तसं काही दिसलं नाही. पण फायनलमध्ये मात्र तिचं बोलणं खरं ठरलं.
शेफालीनं खरंच तसा करिश्मा करून दाखवला. फायनलमध्ये शेफालीनं 87 धावांसह 2 विकेट घेत अष्टपैलू कामगिरी करून दाखवली.
पहिलाच चेंडू खणखणीत चौकार खेचत शेफाली वर्मानं फटकेबाजी सुरू केली. त्यानंतरही तिनं फटकेबाजी करत गोलंदाजांवर चांगलाच दबाव आणला. तिनं 2 षटकार आणि 7 चौकार लगावत फटकेबाजी केली.
त्यानंतर सामन्यात अशी वेळ आली तेव्हा भारतीय बोलर्सची धुलाई होत होती. तेव्हा शेफालीनं सेट झालेल्या लूसची विकेट घेतली. नंतर कापलाही बाद केलं.
प्लेयर ऑफ द मॅचची मानकरी ठरल्यानंतर खऱ्या अर्थानं या विजयात शेफालीचा किती मोठा वाटा होता हे अगदी स्पष्ट झालं.
एकीकडे प्लेयर ऑफ द मॅच तर दुसरीकडे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेली दीप्ती शर्मा. म्हणजे रिल्समध्ये येतं तसं शर्माजी आणि वर्माजींच्या मुलींनी क्रिकेट गाजवलं.
दीप्ती शर्मान संपूर्ण स्पर्धेप्रमाणेच फायनलमध्येही उत्तम अष्टपैलू कामगिरी केली. तिनं 58 धावांसह 5 विकेट घेतल्या. त्यामुळं बॅटिंग आणि बोलिंक दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली.
आघाडीच्या फलंदाजांच्या अनुपस्थित दीप्तीनं एका बाजूनं विकेट जात असताना दुसरी बाजू भक्कमपणे सांभाळली. तिनं फटकेबाजी करण्याऐवजी विकेट सांभाळली आणि त्यामुळंच भारत 298 धावांपर्यंत पोहोचू शकला.
गोलंदाजीमध्ये दीप्तीनं दक्षिण आफ्रिकेच्या 5 बॅटर्सना बाद केलं. पण त्यापैकी सर्वात महत्त्वाची विकेट होती, कर्णधार लॉरा वुलक्राफ्टची. कारण ती भारतासाठी धोका ठरत होती.
शतकी खेळी करत तिनं दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी सगळे प्रयत्न पणाला लावले. पण दीप्तीनं त्यावर पाणी फेरलं. दीप्तीच्या पाच बळींपैकी ती एक ठरली. लॉरा आणखी काही काळ टिकली असती तर तिची फलंदाजीची शैली पाहता, ती भारताला धोका निर्माण करू शकली असती. अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या दीप्तीनं या स्पर्धेत तब्बल 12 विकेट घेतल्या आहेत.
स्मृती मंधानानं संपूर्ण विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत स्मृती 9 सामन्यांत 434 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.
त्यामुळं या सामन्यात सलामीला आलेल्या स्मृतीच्या कामगिरीवर संघाची कामगिरी मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती. स्मृतीनं सामन्यात सुरुवातीला परिस्थिती समजून घेत संयमी सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला शेफाली धावा करत होतीच, त्यामुळं सुरुवातीला विकेट टिकवण्याचं महत्त्वं समजत स्मृतीनं विचारपूर्वक खेळ केला.
पण त्यानंतर स्मृतीनंही आफ्रिकेच्या बोलर्सना नामोहरम करून सोडलं. आठ चौकारांसह तिनं 45 धावा केल्या. अर्धशतक हुकलं असलं तरी शेफालीच्या साथीनं केलेल्या शतकी भागिदारीमुळं भारताच्या डावाचा भक्कम पाया रोवला गेला.
त्यामुळं संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी सलामीला येत इंजीनचं काम केलेल्या स्मृतीचाही या विजयात मोलाचा वाटा ठरला. हे संपूर्ण वर्षच सांगलीची कन्या असलेल्या स्मृतीसाठी खास ठरलं आहे. या वर्षात तिनं वन डेमध्ये पाच शतकं केली आहेत.
धोनीला मैदानावर फटकेबाजी करताना पाहत मोठी झालेल्या ऋचासाठी माहीच तिचा आयडलही बनला. त्याचाच आदर्श घेत ऋचा क्रिकेट खेळायला लागली. त्यामुळं धोनीसारखेच अगदी मैदानावर उतरल्यापासून अगदी ठरवेल त्या चेंडूवर मोठे फटके खेळण्याची क्षमता तिनं निर्माण केली.
ऋचाची हीच क्षमता आणि शैली भारतासाठी फायनलमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरली. ऋचा भारत 245 धावांवर असताना मैदानात उतरली होती. तेव्हा भारतीय फलंदाजीचा वेग काहीसा कमी झाला होता. कारण दुसऱ्या बाजुला दीप्तीला विकेट टिकवत खेळणं गरजेचं होतं.
ऋचानंही लगेच फटकेबाजीची जबाबदारी खांद्यावर घेतली. मैदानात आल्यावर दुसऱ्याच चेंडूवर तिची बॅट तळपली आणि तिनं डीक्लार्कच्या गोलंदाजीवर एक खणखणीत षटकात खेचत इरादे साफ केले. त्यानंतर दोन षटकार आणि तीन चौकार लगावत 24 चेंडूंमध्ये 34 धावा खेचल्या.
भारतानं दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं. त्यांची कर्णधार लॉरानं काही वेळ चिंता वाढवली होती. त्यामुळं ऋचानं ऐनवेळी येत झटपट केलेल्या या 34 धावा भारतासाठी मोलाच्या ठरल्या. कारण दक्षिण आफ्रिकेवर त्यामुळंच 299 धावांचं दडपण तयार झालं होतं. शिवाय यष्टीरक्षक म्हणूनही ऋचानं भारतासाठी बऱ्याच धावा वाढवल्या.
क्रिकेटमध्ये साधारणपणे फलंदाज आणि गोलंदाज यांनाच ग्लॅमर असतं. काही निवडक नावं वगळली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्यांबद्दल फार बोललं जात नाही. पण या फायनलमध्ये भारताच्या क्षेत्ररक्षणाकडं आणि खासकरून अमनज्योतकडं दुर्लक्ष करून चालणार नाही.
खरंतर सामना भारताच्या बाजुनं कधी फिरला यासाठी प्रत्येक जणाकडे काही वेगवेगळे क्षण असतील यात शंका नाही. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणता येईल असा क्षण म्हणजे, दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट. ही विकेट अमनज्योतनं चपळाईनं चेंडू अडवत अत्यंत अचूकपणे केलेल्या थ्रोमुळं झालेला रन आऊट होता.
दक्षिण आफ्रिकेच्या डावात दहाव्या ओव्हरमध्ये रेणुकाच्या तिसऱ्या चेंडूवर ब्रिट्सनं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण मैदानात ज्या भागातून ती धाव घेण्याचा प्रयत्न ब्रिट करत होती तिथं क्षेत्ररत्रणासाठी भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक अमनज्योत होती.
तिनं धाव पूर्ण होण्याआधीच थेट स्टंपवर थ्रो केला आणि ब्रिटला धावबाद केलं. ज्या बाजुनं तिनं हा थ्रो केला होता तिथून तीनपैकी एकच किंवा फार तर दीड स्टंप दिसत असावा. पण तरीही अमनज्योत चुकली नाही आणि भारताला पहिली विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधारा लॉरा आणि ब्रिट यांनी पहिल्या ओव्हर चांगल्या खेळून काढल्या होत्या. त्यांची भागिदारी होत होती. ती जर आणखी वाढली असती तर काय होणार हे सर्वांनाच कळत होतं. पण अमनज्योतनं तसं होऊ दिलं नाही.
एवढंच नाही तर भारतासमोर शेवटच्या ओव्हर्समध्ये निर्माण झालेला दुसरा धोका परतवण्यातही तिचाच मोठा वाटा होता. कर्णधार लॉरा वुलक्राफ्टनं शतक केल्यानंतर ती विजयासाठी फटकेबाजी करणार हे स्पष्ट होतं.
तिनं तशी सुरुवातही केली. पण तिच्या दुर्दैवानं मैदानावर हवेत मारलेल्या एका चेंडूखाली त्यावेळी नेमकी अमनज्योत धाव आली. तिच्या हातातून एकदा नव्हे दोनदा झेल सुटणार होता. पण अमननं चेंडूचा पिच्छा सोडला नाही आणि लॉराला बाद करत भारताची सामन्यावरची पकड मजबूत केली.
सामन्याचा विचार करता खऱ्या अर्थानं हे दोन टर्निंग पॉइंट ठरले आणि दोन्हीतही अमनज्योतचा मोलाचा वाटा होता.
वादळामध्ये अडकलेलं जहाज सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर ज्या जहाजाचा कॅप्टन खंबीर असावा लागतो आणि वेळोवेळी त्याला योग्य निर्णय घ्यावे लागतात. क्रिकेटमध्येही तसंच असतं. त्यात या फायनलमध्ये तर त्याची झलकही पाहायला मिळाली.
हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला क्रिकेट संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात तशीच भूमिका पार पाडली. दक्षिण आफ्रिकेला 298 धावा करण्यापासून रोखण्यासाठी अगदी एका एका चेंडूवर विचार करून ती निर्णय घेत होती.
एका क्षणाला दक्षिण आफ्रिकेची विकेट पडत नव्हती त्यावेळी हरमनप्रीत बोलरशी बोलली आणि तिनं जेमिलाला खेळपट्टीच्या अगदी खेचून बॅटरच्या समोर फिल्डिंगसाठी उभं केलं. तेव्हा बॅटरनं खेळलेला चेंडू अगदी जेमिमा समोर पडला. थोडा पुढं असता तर ती विकेट मिळाली असती.
तसंच, शेफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय. शेफाली गोलंदाज म्हणून ओळखली जात नाही. यापूर्वी खेळलेल्या 30 सामन्यांत तिनं फक्त एक विकेट घेतलेली होती. पण हरमननं तिला गोलंदाजीसाठी निवडलं.
मैदानावर मला शेफाली दिसली आणि वाटलं की आज तिचा दिवस आहे तर चेंडू तिच्या हाती देऊन पाहू असं वाटलं आणि तिला गोलंदाजी दिलं असं हरमनप्रीतनं सांगिलं. चांगल्या कर्णधाराचं ते उत्तम उदाहरण होतं. ही फक्त दोन उदाहरणं होती, या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत याच नेतृत्वगुणाच्या जोरावर तिनं भारताला विश्वविजयाचं स्वप्न दाखवलं आणि ते पूर्णही केलं.
वेगवेगळ्या सामन्यांत वेगवेगळ्या क्षणी टीममधील सगळ्या खेळाडू आणि अगदी सपोर्ट स्टाफचीही भूमिका विजयात महत्त्वाची होती, यात शंकाच नाही. पण रविवारी झालेल्या फायनलमध्ये या 6 जणींची कामगिरी भारताला जगज्जेतेपदापर्यंत घेऊन गेली, हेही तेवढंच खरं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
2025-11-03T05:49:14Z