महिला विश्वचषक : दक्षिण आफ्रिकेला चितपट करत भारताच्या रणरागिणी इतिहास घडवतील?

महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

आज, रविवारी, दुपारी तीन वाजता नवी मुंबईतील डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या महिला टीमनं विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

याआधी 2005 आणि 2017 साली भारताला उपविजेतेपद मिळालं होतं.

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी शानदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे.

नवी मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतासमोर विजयासाठी 339 धावांचं भलं मोठं आव्हान होतं.

पण जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. जेमिमालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमनं धावांचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

वर्ल्ड कप फायनलच्या आधी कॅप्टन हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्या आधी कॅप्टन हरमनप्रीत कौरने असं म्हटलंय की, माझा आणि माझ्या टीमचा असा पूर्ण प्रयत्न असेल की शंभर टक्के देऊ आणि गेम एन्जॉय करू.

सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत हरमनप्रीतने म्हटलं की, "फायनलमध्ये खेळणं हा सर्वांसाठीच अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही ज्या सामन्यात एन्जॉय केलंय आणि आमचं शंभर टक्के देऊ केलंय, तिथे आम्हाला पॉझिटीव्ह रिझल्ट्स मिळाले आहेत."

पुढे तिने म्हटलंय की, "इथेही आता आमची भूमिका अशीच राहील की, कोणतीही परिस्थिती असो, आम्हाला हा सामना एन्जॉय करायचा आहे."

भारतीय टीमला दोनवेळा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

तिसऱ्यांदा फायनल खेळण्याबाबतच्या प्रश्नावर हरमनप्रीतने म्हटलंय की, "हारल्यानंतर काय वाटतं, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र, जिंकल्यानंतर कसं वाटतं, ते जाणून घेण्यासाठी आपण सगळेच प्रतीक्षा करतो आहोत."

"आशा आहे की, हा अंतिम सामन्याचा दिवस आमच्यासाठी स्पेशल असेल," असंही ती म्हणाली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांच्या दरम्यान अंतिम सामना होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्डेडियममध्ये खेळला जाईल.

दोन्हीपैकी जो संघ हा सामना जिंकेल, तो पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनणार आहे.

जेमिमाच्या खेळीचा करिष्मा

भारताच्या या विजयात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठोकलेलं शतक निर्णायक ठरलं.

आपल्या पहिल्याच विश्वचषकात खेळताना जेमिमानं ही शानदार कामगिरी बजावली. तिनं 134 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 धावांची खेळी केली.

जेमिमाचं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधलं हे तिसरंच शतक आहे.

खरं तर जेमिमा एरवी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करते, पण आज तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

त्याविषयी सामन्यानंतर बोलताना जेमिमानं सांगितलं की भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर जेमिमा शॉवर घ्यायला गेली. आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचं आहे, हे तिला आधी माहिती नव्हतं.

खेळायला उतरण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी तिला तिसऱ्या क्रमांकवार खेळावं लागणार असल्याची माहिती मिळाली.

त्याआधी 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या दोन्ही सलामीवीर किम गार्थच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतल्या.

शफाली वर्मान 5 चेंडूंमध्ये 10 धावा करून पायचीत झाली. तर हिलीनं स्मृती मंधानाचा 24 धावांवर झेल टिपला.

मग जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीतनं 167 धावांची झुंजार भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

हरमनप्रीत 88 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह 89 धावा करून बाद झाली. अ‍ॅश्ली गार्डनरनं अ‍ॅनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीवर हरमनप्रीतचा झेल टिपला.

दीप्ती शर्मा लवकर धावचीत झाली. तिनं 17 चेंडूंमध्ये तीन चौकारांसह 24 धावा केल्या.

ऋचा घोषनं आल्या आल्या फटकेबाजी सुरू केली आणि 16 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावाही केल्या. पण सदरलँडच्या गोलंदाजीवर गार्थनं तिचा झेल टिपला.

अमनजोत कौरनं 8 चेंडूंमध्ये दोन चौकारांसह नाबाद 15 धावा ठोकत भारताच्या विजयाला हातभार लावला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

2025-11-02T04:46:43Z