बर्मिंघम : टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये इतिहास घडवला आहे. मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 10 रन पूर्ण करताच यशस्वीच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. जयस्वाल टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 2 हजार रन पूर्ण करणारा संयुक्त भारतीय बॅटर बनला आहे. जयस्वालने द्रविड आणि सेहवागशी बरोबरी केली आहे. जयस्वालला दुसऱ्या इनिंगमध्ये मोठी खेळी करता आली नाही, 22 बॉलमध्ये 28 रन करून जयस्वाल आऊट झाला, याआधी त्याने पहिल्या इनिंगमध्ये 87 रन केल्या होत्या.
यशस्वी जयस्वालला 2 हजार रनचा टप्पा गाठण्यासाठी 10 रनची आवश्यकता होती, पण त्याला पहिल्या डावात हा विक्रम करता आला नाही. त्याने 40 व्या कसोटी डावात 2 हजार रन पूर्ण केल्या. याआधी, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडनेही 40 इनिंगमध्ये त्यांच्या दोन हजार टेस्ट रन पूर्ण केल्या होत्या. जयस्वालने पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये शानदार शतक ठोकले होते. द्रविडने 1999 मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध आणि सेहवागने 2004 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. विजय हजारे यांनी 43 इनिंगमध्ये 2 हजार रन पूर्ण केले होते. विजय हजारे यांनी 1953 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली.
यशस्वीचा जन्म 28 डिसेंबर 2001 साली उत्तर प्रदेशच्या भदोही येथे झाला. त्याने वयाच्या 9व्या वर्षी क्रिकेटसाठी घर सोडलं. उत्तर प्रदेशमधील भदोही येथून तो थेट मुंबईमध्ये आला. मुंबईत आला तेव्हा यशस्वी जयस्वालकडे फार पैसेही नव्हते. मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवत असतानाच जयस्वाल एका डेअरीमध्ये काम करायचा. डेअरीमधून मिळणाऱ्या पैशातून त्याचा रोजचा खर्च कसाबसा भागायचा. पण काही काळानंतर डेअरी मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकलं.
डेअरीमधून काढून टाकल्यानंतर यशस्वी जयस्वाल क्रिकेटसाठी मैदानात उभारलेल्या तंबूमध्येच झोपायला लागला. तसंच त्याने मैदानाबाहेर पाणी पुरी विकायलाही सुरूवात केली. मुलाला तंबूत झोपायला लागत आहे, हे समजताच यशस्वीच्या आईने त्याला पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये घरी बोलावलं, पण यशस्वी आईचं ऐकला नाही. मोठा होईपर्यंत गावाला परतणार नाही, असं जयस्वालने आईला सांगितलं. यानंतर यशस्वीने मागे वळून पाहिलं नाही आणि आज त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. यशस्वीची ही संघर्षपूर्ण कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
2025-07-04T18:33:04Z