रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट शेअर करून दिली माहिती

Rohit Sharma : टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. रोहितने इंस्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली असून त्याने यासोबतच भावनिक पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितने टेस्ट आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे क्रिकेटमध्ये पुढील काळात खेळत राहणार अशी माहिती दिली आहे. 

काय म्हणाला रोहित शर्मा? 

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'. 

रोहित शर्माची कारकीर्द : 

टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला. 

2025-05-07T14:20:56Z