रोहित शर्मा सर्वात ‘वयस्कर सामनावीर’! रचला नवा इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma ICC Record : भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तब्बल 12 वर्षांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यासह 50-50 षटकांच्या आयसीसी स्पर्धेतील दीर्घकाळाची विजेतेपदाची प्रतीक्षा संपवली. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारताच्या विजयात संघाची सामूहिक कामगिरी महत्त्वाची ठरली. एखादा फलंदाज अपयशी ठरला तर दुस-याने जबाबदारी स्विकारून धावा केल्या अडचणीत सापडलेल्या संघाला सावरले. तर एकूण स्पर्धेचा आढावा घेतला तर भारतीय फिरकीपटूंनीही महत्त्वाची भूमिका बजावत विरोधी संघाला वेसण घातले.

विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या यांनी गट सामन्यांमध्ये संघाला मजबूत ठेवले, तर कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात शानदार 76 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शानदार कामगिरी केली.

रोहित शर्माने रचला इतिहास

रोहितच्या 76 धावांच्या खेळीने त्याला इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्ये स्थान मिळवून दिले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. आयसीसी वनडे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हा पुरस्कार जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने 37 वर्षे आणि 313 दिवसांचे वय असताना ही कामगिरी नोंदवली.

ICC वनडे अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारे सर्वात वयस्कर खेळाडू

  • 37 वर्षे 313 दिवस : रोहित शर्मा (भारत विरुद्ध न्यूझीलंड, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025)

  • 35 वर्षे 165 दिवस : अ‍ॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, विश्वचषक 2007)

  • 32 वर्षे 274 दिवस : मोहिंदर अमरनाथ (भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, विश्वचषक 1983)

  • 30 वर्षे 294 दिवस : क्लाईव्ह लॉईड (वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विश्वचषक 1975)

याशिवाय, रोहित शर्मा हा क्लाइव्ह लॉयड (वेस्ट इंडिज), रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) आणि एमएस धोनी (भारत) यांच्यानंतर आयसीसी एकदिवसीय अंतिम सामन्यात सामनावीर ठरणारा चौथा कर्णधार बनला आहे. तसेच, तो जगातील एकमेव बनला कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने सर्व प्रमुख आयसीसी स्पर्धांची अंतिम फेरीत गाठली. भारताच्या या ऐतिहासिक विजयासह, संघाने 50 षटकांच्या आयसीसी स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

2025-03-10T11:08:39Z