पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिसमध्ये सोमवारी (दि. २) झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics 2024) भारताच्या भालाफेकपटू सुमित अंतिलने गोल्डन कामगिरी केली. सुमितने ७०.५९ मीटरच्या पॅरालिम्पिक विक्रमासह सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने 6 थ्रो दरम्यान दोनदा स्वतःचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला.
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ (Paris Paralympics 2024) मध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे. सुमित अंतिलने पुरुषांच्या भालाफेक (F64 श्रेणी) मध्ये सुवर्णपदक जिंकले. सुमितने दुसऱ्या प्रयत्नात ७०.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील (F64 श्रेणी) सर्वोत्तम थ्रो ठरला. दुसरीकडे, बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनने महिला एकेरी SH6 मध्ये कांस्यपदक जिंकले. नित्याने कांस्यपदकाच्या लढतीत इंडोनेशियाच्या रीना मर्लिनाचा २१-१४, २१-६ असा पराभव केला.
या दोन पदकांसह भारताच्या सध्याच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील (Paris Paralympics 2024) पदकांची संख्या १५ झाली आहे. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि सात कांस्यपदके जिंकली आहेत. सुमित अंतिलने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. अशा परिस्थितीत पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा रक्षण करणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे.
2024-09-03T02:28:14Z dg43tfdfdgfd