बर्मिंघम : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 407 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाला तब्बल 180 रनची आघाडी मिळाली आहे. मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 6 तर आकाश दीपने 4 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या दिवसाची सुरूवात इंग्लंडने 77/3 अशी केली होती, त्यानंतर पहिल्या अर्ध्या तासामध्येच सिराजने इंग्लंडला रूट आणि स्टोक्सच्या रुपात दोन धक्के दिले. लागोपाठ दोन बॉलला सिराजने दोन विकेट घेतल्या, पण त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुकने भारतीय बॉलिंगवर आक्रमण केलं.
जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक यांच्यात तब्बल 303 रनची पार्टनरशीप झाली. जेमी स्मिथ 184 रनवर नाबाद राहिला, तर हॅरी ब्रुकने 158 रनची खेळी केली. स्मिथ आणि ब्रुकची पार्टनरशीप तोडल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडच्या शेवटच्या 5 विकेट फक्त 20 रनवर घेतल्या. या इनिंगमध्ये इंग्लंडचे 6 खेळाडू शून्य रनवर आऊट झाले आहेत.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर गिलचं द्विशतक तसंच यशस्वी जयस्वालच्या 87 आणि रवींद्र जडेजाच्या 89 रनमुळे टीम इंडियाने तब्बल 587 रनपर्यंत मजल मारली होती. पहिल्या इनिंगमध्ये 180 रनची आघाडी मिळाल्यामुळे टीम इंडिया या सामन्यात मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. या टेस्ट मॅचचे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत.
याआधी झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. शेवटच्या दिवशी 371 रनच्या आव्हानाचा पाठलागही इंग्लंडने 5 विकेट गमावून अगदी सहज केला होता.
2025-07-04T16:48:04Z