'ही शुभमनची टीम, हेड कोचची नाही', गावस्करांनी गंभीरचे पंख छाटले, म्हणाले...

Sunil Gavaskar On Kuldeep Yadav : मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव याची संघात निवड न झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता ओव्हलमध्ये कुलदीपला संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता टीम इंडियाचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय. कोणत्या खेळाडूंना निवडायचं आणि कुणाला नाही, हा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे कर्णधाराचा असावा आणि मुख्य प्रशिक्षकासह इतर कोणाचाही त्यावर प्रभाव नसावा, असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

शुभमनला कुलदीप हवा होता पण...

सुनील गावस्कर यांनी भारतीय संघातील निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोनी स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर यांनी स्पष्ट केले की, "शेवटी, संघ हा कर्णधाराचा असतो." त्यांनी यावर भर दिला की, कदाचित शुभमन गिलला शार्दूल ठाकूर नको होता आणि त्याऐवजी कुलदीप यादव हवा होता. कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये असायला हवा होता, असं सुनील गावस्कर म्हणाले. पण अतिरिक्त बॅटर खेळवण्याच्या नादात कुलदीपला ड्रॉप केलं गेलं.

अखेरचा निर्णय कॅप्टनचा हवा - सुनील गावस्कर

शुभमन गिलला टीममध्ये ते मिळायला हवे होते. तोच कप्तान आहे. लोक त्याच्या आणि त्याच्या कॅप्टन्सीबद्दल बोलतील. त्यामुळे हा निर्णय खरंतर त्याचाच असायला हवा. ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक आहे हे दाखवण्यासाठी अंतर्गत मतभेद किंवा निवड संबंधित मुद्दे जाणूनबुजून लपवले जाऊ शकतात, असंही गावस्कर म्हणाले आहेत.

आमच्या वेळी असं नव्हतं... - गावस्कर

मला माहीत आहे की, सर्व काही ठीक-ठाक आहे हे दाखवण्यासाठी या गोष्टी कदाचित समोर येणार नाहीत. सत्य हे आहे की, कॅप्टन जबाबदार आहे. तोच इलेव्हनचे नेतृत्व करेल. ही सामान्य गोष्ट आहे. आमच्याकडे कोच नव्हते. आमच्याकडे फक्त माजी खेळाडूच टीमचे मॅनेजर किंवा असिस्टंट मॅनेजर असायचे. ते असे लोक होते ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही बोलू शकत होतात, ते तुम्हाला लंचच्या वेळी, दिवसाच्या खेळाच्या शेवटी किंवा मॅचच्या आदल्या दिवशी सल्ला देत असत, असंही गावस्कर यांनी म्हटलं आहे.

2025-07-29T02:48:06Z