मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना 1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला, ज्या घटनेला आता 148 वर्ष झाली आहेत. क्रिकेटच्या 148 वर्षांच्या या इतिहासामध्ये अनेक विक्रम बनवले गेले आणि मोडलेही गेले, पण एवढ्या दीर्घकाळानंतर कधीही न झालेला विक्रम पहिल्यांदाच झाला आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या 81 व्या सामन्यात, कॅनडाचा सामना स्कॉटलंडविरुद्ध झाला. हा सामना किंग सिटी येथील मेपल लीफ नॉर्थ-वेस्ट ग्राउंडवर खेळला गेला, जिथे स्कॉटलंडने कॅनडाचा 7 विकेट्सने पराभव केला. दोन्ही टीममध्ये झालेल्या या सामन्यात एक अनोखी घटना पाहायला मिळाली. स्कॉटलंडने टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण कॅनडाच्या टीमसोबत इनिंगच्या पहिल्या दोन बॉलवर असं काही घडलं, जे 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं.
टॉस गमावल्यानंतर पहिले बॅटिंग करायला आलेल्या कॅनडाने पहिल्या दोन बॉलवर दोन्ही ओपनरना गमावले, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. इनिंगच्या पहिल्या दोन बॉलवर दोन विकेट्स पडण्याचा विक्रम अनेक वेळा झाला आहे, पण दोन्ही ओपनर पहिल्या दोन बॉलवर आऊट होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. ब्रॅड करीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हा रेकॉर्ड झाला आहे.
मॅचच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ब्रॅड करीने कॅनडाचा ओपनर अली नदीमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर परगत सिंग बॅटिंगसाठी आला. त्याच वेळी दुसरा ओपनर युवराज समरा नॉन-स्ट्राइकवर उभा होता. पण तो दुसऱ्याच बॉलवर रनआऊट झाला. त्यामुळे कॅनडाने पहिल्या दोन बॉलवर आपले दोन्ही ओपनर गमावले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात कॅनडाच्या बॅटिंगवर सुरुवातीपासूनच दबाव होता. स्कॉटलंडचा फास्ट बॉलर ब्रॅड करीने शानदार बॉलिंग केली आणि 3 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे कॅनडाच्या टीमने 11 ओव्हरमध्ये फक्त 18 रनमध्ये 5 विकेट्स गमावल्या. यानंतर, श्रेयस मोव्वाने टीमला मॅचमध्ये परत आणण्याचा प्रयत्न केला, त्याने 60 रनची खेळी केली. ज्यामुळे कॅनडा 48.1 ओव्हरमध्ये 184 रन करण्यात यशस्वी झाला. स्कॉटलंडकडून ब्रॅड करीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, स्कॉटलंडने हे आव्हान 41.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केले.
2025-09-01T17:03:07Z