'7 दिवसाच्या आरामानंतर तुम्ही...', टीम इंडियावर संतापून रवी शास्री म्हणाले, 'ही कसोटी फार..'

Ravi Shastri ENG vs IND 2025 2nd Test India playing 11: भारताचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू रवी शस्री यांनी संघ व्यवस्थापनावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. भारताचा स्टार गोलंदाज आणि हुकुमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीमध्ये न खेळवण्याच्या निर्णयावरुन शास्री संतापलेत. एजबस्टन येथील बुमराहला का वगळण्यात आलं हे न समजण्यासारखं असल्याचं म्हटलंय. लीड्स येथील कसोटीला सात दिवस झाल्यानंतरही बुमराहला वगळण्याचा निर्णय का घेण्यात आला, हे अनाकलनीय आहे असं शास्री म्हणालेत.

गिलनेच केला याबद्दलचा खुलासा

बुमराहचा दुसऱ्या कसोटीमध्ये अंतिम 11 खेळाडूंमध्ये समावेश होणार की नाही याबद्दल आधीपासूनच शंका उपस्थित केली जात होती. बुमराहवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला संघाबाहेर बसवलं जाणार की केवळ तीनच कसोटी खेळू शकतो सांगणाऱ्या बुमराहला दुसऱ्या कसोटीमध्येही संघात स्थान दिलं जाणार याबद्दल उलटसुलट चर्चा होतीच. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने बुधवारी दुसऱ्या कसोटीची नाणेफेक होण्याआधीच बुमराहला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आल्याचं जाहीर केलं. बुमराह लॉर्ड्सवरील तिसरी कसोटी खेळेल असंही शुभमनने सांगितलं.

शास्रींनी साधला निशाणा

मात्र नाणेफेक झाल्यानंतर 'स्काय स्पोर्ट्स'शी बोलताना रवी शास्रींनी या निर्णयावरुन टीका केली. दुसरी कसोटी ही मालिकेच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं रवी शास्रींनी अधोरेखित केलं. पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाला असल्याने भारताने ही कसोटी जिंकणं त्यांना अत्यावश्यक आहे, असं शास्रींना सांगायचं होतं. "मला वाटतं मायकलने नाणेफेकीदरम्यान प्रश्न विचारला होता. मालिकेच्या दृष्टीने विचार केल्यास भारतासाठी ही कसोटी फार महत्त्वाची आहे. तुम्ही न्यूझीलंडविरुद्ध 3, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 आणि इथली पहिली कसोटी गमावली आहे. तुम्हाला पुन्हा विजयपथावर येणं आवश्यक आहे. तुमच्याकडे जागतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असताना तुम्ही त्याला बाहेर बसवता. 7 दिवसांचा आराम मिळाल्यानंतरही तुम्ही हा निर्णय घेता हे आश्चर्यकारक आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे," असं शास्रींनी संतापून म्हटलं.

भारतीय संघामध्ये करण्यात आले तीन बदल

दुसऱ्या कसोटीमध्ये बुमराहच्या जागी आकाश दीपला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर साई सुदर्शनच्या जागी नितेश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकुरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीमधील संघ दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरवला आहे.

पहिल्या दिवसात काय झालं?

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 310 धावा गेल्या आहेत. कर्णधार गिल हा शतक झळकावून नाबाद असून त्याच्या जोडीला मैदानात रविंद्र जडेजा आहे. भारताचा सलामीवीर यशस्वी जयसवालने 87 धावांची दमदार खेळी केली. 

 

2025-07-03T07:11:00Z