KOHLI VS AZAM: कोहलीसारखाच कोणीच नाही! बाबरला त्याच्यासारखं व्हायचं असेल तर...; पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं विधान

Babar Azam Virat Kohli Comparison: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची तुलना कायमच केली जाते. अर्थात फलंदाज म्हणून दोघेही आपआपल्या संघांसाठी उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. या दोघांच्या फलंदाजीचा दोन्ही देशांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. मात्र चाहत्यांबरोबरच दोन्ही देशांमधील आजी-माजी खेळाडूही या दोन्ही खेळाडूंबद्दल अनेकदा वेगवगेळ्या कार्यक्रमांमध्ये विधानं करत असतात. असेच एक विधान पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझाकने (Abdul Razzaq) केलं आहे. रझाकने विराटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यावेळी त्याने बाबर आझमचीही विराटशी तुलना करत आपल्याच संघाच्या कर्णधाराचे कान टोचले आहेत.

विराट सरस कारण...

विराट कोहलीच्या फिटनेससंदर्भात भाष्य करताना रझाकने विराटचा फिटनेस हा जागतिक स्तरावरील कोणत्याही अव्वल खेळाडूला शोभेल असाच असल्याचं म्हटलं आहे. फिटनेसच्या बाबतीत विराटसमोर बाबर आझम दूरदूरपर्यंत त्याच्या आसपासही नसल्याचं रझाकने म्हटलं आहे. आझमला विराटसारखा खेळाडू व्हायचं असेल तर अनेक बाबतींसंदर्भात त्याला स्वत:मध्ये अमुलाग्र बदल घडावावे लागतील असं रझाकने स्पष्टपणे सांगितलं आहे.

प्रत्येक संघाकडे असा एक...

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रझाकने, "कोहलीबद्दलची सर्वात खास बाब म्हणजे त्याची फिटनेस. त्याची फिटनेस ही वर्ल्ड क्लास म्हणजेच जागतिक स्तरावरील खेळाडूसारखी आहे. बाबर आझमची फिटनेस ही विराटसाठी उत्तम दर्जाची नाही. बाबरला आपल्या फिटनेसवर अजून कष्ट घ्यावे लागतील," असं निरिक्षण नोंदवलं आहे. बाबर हा पाकिस्तानचा नंबर 1 खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीमध्ये तो वनडे क्रिकेटमधील आघाडीचा फलंदाज आहे. टी-20, कसोटी, एकदिवसीय क्रिकेट या सर्वांमध्येच तो चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक संघाकडे असा (विराट आणि बाबरसारखा) एक खेळाडू असतोच, असंही रझाकने म्हटलं आहे.

दोघांची तुलना करु नये कारण...

"विराट एक उत्तम आणि भन्नाट खेळाडू आहे. विराट आपल्या संघाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. तो कायम सकारात्मक विचारतो करतो. तो स्वत:मधील कौशल्य फारच उत्तमपणे वापरतो," असंही रझाक म्हणाला. स्वत: विराट आणि बाबरची तुलना केल्यानंतरही रझाकने क्रिकेटच्या जाणकारांनी या दोन्ही खेळाडूंची तुलना करु नये असं मत व्यक्त केलं. विराट आणि बाबरची तुलना करु नये कारण दोघेही जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत, असं तो म्हणाला. "आपण त्यांची तुलना करता कामा नये. कपिल देव उत्तम की इम्रान खान? असं विचारण्यासारखं हे झालं," असं मत रझाकने विराट आणि बाबरच्या तुलनेबद्दल बोलताना व्यक्त केलं.

"कोहली भारताचा सर्वोत्तम खेळाडू असून बाबर पाकिस्तानी संघासाठी हीच भूमिका बजावतो. कोहली जागतिक स्तरावरील खेळाडू असून बाबरही त्याच तोडीचा खेळाडू आहे. मात्र कोहलीची फिटनेस ही बाबरपेक्षा फारच उजवी आहे," असं रझाक म्हणाला.

2023-03-28T09:23:01Z dg43tfdfdgfd