KULDEEP YADAV: कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतणार, काय झालं ते जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामन्यांचा खेळ संपला असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. अजून दोन सामन्यांचा खेळ शिल्लक असताना कुलदीप यादवला संघातून रिलीज करण्यात आलं आहे. आता उर्वरित दोन सामन्यात कुलदीप यादव नसणार आहे. तिसऱ्या टी20 सामन्यातही त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी येण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे. दक्षिण अफ्रिका ए संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसीय कसोटी सामन्यात कुलदीप यादव इंडिया ए संघाकडून खेळणार आहे. दक्षिण अफ्रिका ए संघाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 6 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यात कुलदीप यादव कसोटी मालिकेची तयारी करणार आहे.

कुलदीप यादवला रिलीज करण्याचं कारण काय?

कुलदीप यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यात प्लेइंग 11 चा भाग होता. पण पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादव खेळला होता आणि दोन विकेट घेतल्या होत्या. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप यादव मुख्य फिरकीपटू असणार आहे. त्याला रेड बॉल क्रिकेटची तयारी करण्यासाठी इंडिया ए संघाकडून सामना खेळायचा आहे. या सामन्याचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे असून दोघांची निवड दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत होऊ शकते. भारत दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती. त्याने या मालिकेत 12 विकेट घेतल्या होत्या. दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात तर 5 विकेट घेतल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे. त्याला रवींद्र जडेजाडी साथ लाभेल. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी या मालिकेत 2-0 ने मात द्यावी लागणार आहे.

2025-11-02T15:53:06Z