R Ashwin: भारतीय क्रिकेट संघाला गेल्या 14-15 वर्षात तीन मोठे कर्णधार मिळाले. या तिघांनी संघाला अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने परदेशी भूमीवर कसोटीत अप्रतिम कामगिरी केली. यानंतर रोहित शर्माने T20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकून ICC विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाचा आलेख कायम चढता राहिला आहे. अशातच आता भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने या तिघांपैकी सर्वोत्तम कर्णधाराबाबत भाष्य केले आहे.
भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन या तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे आणि या तिघांचेही कर्णधारपद त्याने अगदी जवळून पाहिले आहे. अशा परिस्थितीत अश्विनने रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या कर्णधारपदाच्या शैलीतील मोठा फरक उघड केला आहे. अश्विन म्हणाला की रोहित संघातील वातावरण हलके करण्यावर भर देतो. धोनी आणि कोहली यांच्यापेक्षा रोहित रणनीतीवर खूप काम करतो, असेही तो म्हणाला.
विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत अश्विनने सांगितले की, 'रोहितच्या कर्णधारपदाबद्दल 2-3 गोष्टी चांगल्या आहेत. संघातील वातावरण तो नेहमी हलके ठेवण्याचा प्रयत्न करतो. तो खूप संतुलित राहतो आणि धोरणात्मकदृष्ट्या सक्षम आहे. धोनी आणि विराट दोघेही रणनीतिकदृष्ट्या मजबूत होते, पण रोहित रणनीतीवर त्यांच्यापेक्षा अधिक काम करतो.'
अश्विन पुढे म्हणाला की, 'रोहित मोठ्या मालिकेपूर्वी विश्लेषण टीमसोबत काम करतो आणि आपल्या खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. जर एखादा मोठा सामना किंवा मालिका येत असेल तर रोहित प्रशिक्षक आणि विश्लेषक टीमसोबत बसतो आणि रणनीती बनवतो. कोणत्या फलंदाजाची कमजोरी काय आहे आणि गोलंदाजाविरुद्ध कोणती योजना आखावी लागेल याबाबत चर्चा केली जाते. त्यानंतर प्रत्येक खेळाडूवर वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. तो खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतो.
भारतीय संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. आर अश्विन या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता आहे, कारण तो गेल्या अनेक वर्षांपासून मायदेशात होणाऱ्या मालिकेत भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. त्याने शेवटची कसोटी मार्च 2024 मध्ये धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध खेळली होती.
2024-09-04T01:23:44Z dg43tfdfdgfd