SUMIT ANTIL : नीरजला जमलं नाही पण सुमितने करून दाखवलं, पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं 'सुवर्ण पदक'

Paris Paralympics Games: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम असल्याचं पहायला मिळतंय. आज भारताच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 7 मेडल्स आले आहेत. भारतासाठी बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार याने सुवर्ण कामगिरी केल्यानंतर आता भारताचा गोल्डन बॉय सुमित अंतिल याने देखील दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.  सुमितने दुसऱ्या प्रयत्नात 70.59 मीटर भाला फेकला जो त्याला सर्वोत्तम थ्रो ठरला. एवढंच नाही तर सुमितचा हा थ्रो पॅरालिम्पिक रेकॉर्ड आहे.

भारताचा स्टार भालाफेक पॅरा ॲथलीट सुमित अँटीलने चमकदार कामगिरी केली आणि पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलंय. टोकियो पॅरालिम्पिकमधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात सुमितला यश आलंय. त्याने टोकियोमध्ये देखील सुवर्ण पदक जिंकवलं होतं. अशातच आता त्याने आपला सुवर्ण पदकाचा मान कायम ठेवलाय. 

कसा रंगला सामना?

सुमित अंतिमने 69.11 मीटरच्या थ्रोने स्पर्धेची सुरुवात केली, पण पुढच्याच प्रयत्नात तो रेकॉर्डब्रेक सर्वोत्तम थ्रो करण्यात यशस्वी झाला. यानंतर, त्याने तिसऱ्या प्रयत्नात 66.66 मीटर भाला फेकला, तर चौथ्या प्रयत्नात त्याचा फाऊल झाला. त्यानंतर त्याने 69.04 मीटर आणि सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 66.57 मीटर भालाफेक केला. मात्र, त्याचा दुसऱ्या भालाफेकमध्येच पदक निश्चित झालं होतं. 

दरम्यान, श्रीलंकेचा कोडिथिवाकू 67.03 मीटरसह दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने रौप्य पदक जिंकलं. तर ऑस्ट्रेलियाचा एम बुरियन तिसऱ्या स्थानावर होता. बुरियनने 64.89 अशी त्याची सर्वोत्तम थ्रो केली. दुसरा भारतीय भालाफेकपट्टू संदीप चौधरी 62.80 मीटरसह चौथ्या स्थानावर राहिला. 

2024-09-02T19:00:49Z dg43tfdfdgfd