भारताचा 14 वर्षीय उदयोन्मुख तारा, वैभव सूर्यवंशीने केलेल्या अविश्वसनीय फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. अवघ्या 31 चेंडूंत 9 षटकार आणि 6 चौकारांसह 86 धावांची झंझावाती खेळी करत सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले.
सूर्यवंशीच्या 86 धावांच्या खेळीत 6 चौकार, 9 उत्तुंग षटकारांची आतषबाजी
277.41 ची धडाकेबाज स्ट्राईक रेटने इंग्लिश युवा गोलंदाजांची धुलाई
भारताचा 14 वर्षीय उदयोन्मुख तारा, वैभव सूर्यवंशीने केलेल्या अविश्वसनीय फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. अवघ्या 31 चेंडूंत 9 षटकार आणि 6 चौकारांसह 86 धावांची झंझावाती खेळी करत सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले.
इंग्लंडने 6 बाद 268 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात भारताने 34.3 षटकांतच 6 गड्यांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
पावसामुळे प्रत्येकी 40 षटकांचा खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या 20 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेटमधील तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
‘आयपीएल’मध्ये विक्रमी शतक झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली. तो बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 8 षटकांत 2 बाद 111 अशी मजबूत स्थितीत होती.
त्यानंतर विहान मल्होत्राने 34 चेंडूंत 46 धावांची खेळी केली; पण त्याच्या विकेटनंतर भारताने थोड्याच वेळात 3 गडी गमावल्याने सामन्यात काहीशी चुरस निर्माण झाली. मात्र, कनिष्क चौहान (नाबाद 43) आणि आर. एस. अंबरीश (नाबाद 31) यांनी 75 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताला 33 चेंडू राखून आरामात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, इंग्लंडकडून यष्टिरक्षक-फलंदाज थॉमस रियूने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. त्याने अवघ्या 44 चेंडूंत नाबाद 76 धावांची खेळी करत संघाला 6 बाद 268 धावांपर्यंत पोहोचवले. त्याला बेन डॉकिन्स (62) याने चांगली साथ दिली. मात्र, सूर्यवंशीच्या वादळी खेळीपुढे इंग्लंडची धावसंख्या आणि गोलंदाजी पूर्णपणे अपुरी ठरली.
2025-07-03T17:11:28Z