टी-२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी धुव्वा उडवत एकच खळबळ उडवून दिली. किंग्जटाऊनमधील अर्नोस वेल ग्राऊंडमध्ये झालेल्या सामन्यात कांगारुंचा फडशा पाडत अफगाणिस्तानानं धक्कादायक निकालाची नोंद केली. या निकालामुळे सुपर-८ मधील ग्रुप १ मधील समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. या गटातील चारही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहेत. पण दोनच संघांना पुढील फेरी गाठता येईल. ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा पराभव केला असता तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले असते. पण ऑस्ट्रेलियाच्या पराभवानं चुरस वाढली आहे.
भारतासाठी काय समीकरण?
सुपर ८ मध्ये दोनपैकी दोन सामने जिंकणाऱ्या भारतासाठीचं समीकरण सोपं आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन टीम इंडिया उपांत्य फेरीत जाईल. कांगारुंविरुद्ध पराभव पत्करावा लागला तरीही टीम इंडिया उपांत्य फेरी गाठू शकते. फक्त हा पराभव मोठा नसावा. सध्या भारताचा नेट रनरेट +२.४२५ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव आणि अफगाणिस्तानचा बांग्लादेशविरुद्ध विजय, असे निकाल लागल्यास भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान नेट रनरेटच्या जोरावर भारताच्या पुढे जातील.
ऑस्ट्रेलियासाठी काय समीकरण?
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे कांगारु अडचणीत आले आहेत. आता त्यांना २६ जूनला भारताचा पराभव करावा लागेल. त्यांना बांगलादेशाचीही मदत लागेल. बांगलादेशनं अफगाणिस्तानचा पराभव केल्यास कांगारुंच्या पथ्थ्यावर पडेल. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +०.२२३ आहे. भारताविरुद्ध पराभव झाल्यास त्यांना बांगलादेशची मदत लागेल. बांगलादेशनं अफगाणिस्तानचा पराभव केल्यास तीन संघांचे प्रत्येकी २ गुण होतील. मग पुढची वाटचाल नेट रनरेटच्या आधारे होईल.
अफगाणिस्तानसाठी काय समीकरण?
उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानी संघाला बांगलादेशचा पराभव करावा लागेल. भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. अफगाणिस्तान बांगलादेशकडून पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ भारताकडून मोठ्या फरकानं पराजित व्हायला हवा. अफगाणिस्तानचा नेट रनरेट सध्या -०.६५० आहे. ऑस्ट्रेलियानं विजय मिळवल्यास अफगाणिस्तानला बांगलादेशचा मोठा पराभव करावा लागला.
बांगलादेशसाठी समीकरण काय?
उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला चमत्काराची गरज आहे. तांत्रिक बाबींचा विचार केल्यास ते अद्याप स्पर्धेत आहेत. दोन पराभवांमुळे त्यांची वाट सर्वात बिकट आहे. त्यांना अफगाणिस्तानला मोठ्या फरकानं नमवावं लागेल. याशिवाय भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा यासाठी प्रार्थना करावी लागेल. बांगलादेश कोणत्याही परिस्थितीत भारताच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यांचा नेट रनरेट -२.४८९ असा दयनीय आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-23T10:33:49Z