आठपैकी आठ, रोहित शर्माचा न्याराच थाट! मुंबईकराची बादशाह कामगिरी, अभिमानास्पद आकडेवारी

मुंबई: टी-२० वर्ल्डकपला गवसणी घालत टीम इंडियानं ११ वर्षांपासून सुरु असलेला विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. मुंबई इंडियन्सला पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावून देणाऱ्या रोहित शर्माला आयपीएल २०२४ च्या आधी कर्णधारपदावरुन दूर करण्यात आलं. गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात रोहितला खेळावं लागलं. पण याच रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं टी-२० वर्ल्डकप जिंकला. तब्बल १७ वर्षांनी भारताला टी-२० जेतेपद मिळवून देण्याची कामगिरी करुन दाखवली.

टी-२० हा रोहितला सर्वाधिक सूट होणारा क्रिकेट फॉरमॅट आहे. आकडेवारी याची साक्ष देते. भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात २००७ मध्ये पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप उंचावला. या संघात रोहित शर्मा होता. या संघातील अन्य कोणताही खेळाडू सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसत नाही. रोहित शर्मा मात्र आजही खेळतोय. संघाचं नेतृत्त्व करतोय. भारतानं २००७ मध्ये पाकिस्तानला नमवत टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी त्यानं सहाव्या क्रमांकावर येऊन १६ चेंडूंमध्ये ३० धावा चोपल्या होत्या. हा सामना भारतानं अवघ्या ५ धावांनी जिंकला.

भारतानं टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयनं देशात आयपीएल स्पर्धा सुरु केली. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पहिल्या ५ हंगामांमध्ये जेतेपद पटकावता आलं नाही. २०१३ मध्ये रोहितच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं जेतेपदाला गवसणी घातली. याच वर्षी त्यानं मुंबईला चॅम्पियन्स लीग टी-२०चं जेतेपद मिळवून दिलं. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्येही रोहितच्याच नेतृत्त्वात मुंबईनं आयपीएल जिंकली. २०१८ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं निधास ट्रॉफी जिंकली.

आता २०२४ मध्ये रोहितच्या नेतृत्त्वात भारतानं टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत भारताला एकही संघ हरवू शकला नाही. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. अशी कामगिरी याआधी कोणत्याच संघाला करता आलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि भारताचा कर्णधार म्हणून रोहितनं ८ वेळा अंतिम फेरीत संघांचं नेतृत्त्व केलं. विशेष म्हणजे यातला एकही सामना रोहितनं गमावलेला नाही. त्यामुळे त्याचा स्ट्राईक रेट १०० टक्के राहिला आहे. ही आकडेवारी रोहितची टी-२०मधील नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब करणारी आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-01T07:34:42Z dg43tfdfdgfd